अमरावती : जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकरिता नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. उमदेवारांना बोधचिन्हांचे वाटप ४ जानेवारी रोजी होणार आहे. यावेळी उमदेवारांसमोर १९० चिन्हांचा पर्याय आहे. या चिन्हांमधून उमेदवार कुठल्याही एका चिन्हाची निवड करू शकतात.
आयोगाने जाहीर केलेल्या १४ तालुक्यांतील ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमात १५ जानेवारी रोजी मतदान होईल. मतदारांची अंतिम मतदार यादी १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापासून गावोगावी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ३० डिसेंबर हा उमदेवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर ३१ डिसेंबर रोजी नामनिर्देशपत्राची छाननी व ४ जानेवारी २०२१ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंत वेळ आहे. त्यानंतर लगेच निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांना बोधचिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
बॉक्स
अशी आहेत चिन्हे
ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष व राज्यस्तरीय पक्ष यांच्याकरिता आरक्षित असलेल्या चिन्हांचा वापर करता येणार नाही. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मुक्त चिन्हांपैकी कोणतेही एक चिन्ह निवडता येणार आहे. यामध्ये १९० चिन्हांची यादी आहे. यात कपाट, सफरचंद, ऑटोरिक्षा, फुगा, बॅट, पुस्तक, बाटली, केक, कॅमेरा, कॅरम बोेर्ड, फुटबॉल, इस्त्री, लॅपटॉप, जग, किटली, चावी, कैची, बासरी, मिक्सर,पंचिंग मशीन, तुतारी, टाईपरायटर, नांगर, चिमटा, कपबशी, हॉकी, कोट, कंगवा, ऊस, पेनड्राईव्ह, पांगुळगाडा, टोपली, चष्मा, हिरा, कलिंगड, पाण्याची टाकी, शिवणयंत्र, विहीर, शिटी, सूप, डिश अँटेना, विजेचा खांब, सोफा, स्टंड, बिगूल, स्कूटर, फ्रीज, फलंदाज, छत्री, कढई, अननस आदी चिन्हांचा समावेश आहे.