फळगळतीसाठी एनआयसीकडून संशाेधनाची मागणी
अमरावती : दरवर्षी जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात संत्राफळाची गळती मोठ्या प्रमाणात होते. परिणामी संत्राउत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र (एनआयसी) मार्फत फळगळीमागील कारणे शोधण्यात यावी, अशी मागणी चांदूर बाजार तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे केली आहे.
गत सहा ते सात वर्षांपासून संत्र्याची फळगळीवरील तीन महिन्यांमध्ये माेठ्या प्रमाणात होते. यामागील मूळ कारणे शोधून मार्गदर्शन करावे, अशी मागणी सातत्याने कृषी विभागामार्फत एनआरसी, नागपूरकडे करण्यात आली. यानुसार चांदूर बाजार तालुक्यात संत्रा फळगळीबाबत सन २०१८-१९ मध्ये कृषी कार्यशाळा घेतली होती. यामध्ये फळगळीबाबत माहिती देण्यात आली होती. यावेळी या फळगळीबाबत नवीन शिफारशी देण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, तेव्हापासून फळगळीबाबत नवीन शिफारसी देण्यात आल्या नाहीत. आजही चांदूर बाजात तालुक्यात संत्रा फळांच्या गळतीचे प्रमाण जवळपास ७० टक्के आहे. हिरवीच फळे गळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे संत्रा फळगळीचे एनआयसीने संशाेधन करून मार्गदर्शन करावे, अशी मागणी वेळोवेळी केली. मात्र, याची दखल घेतली जात नसल्याने या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. १८ ऑगस्ट रोजी संत्राउत्पादक शेतकऱ्यांनी फळगळीवर तातडीने एनआयसीने संशोधन करून मार्गदर्शन करावे, अशी मागणी संत्राउत्पादक शेतकरी प्रदीप बंड, अभिजित पोहोकार, अरविंद कपले, किशोर थोराईत, नरेंद्र सुने, अक्षय थोराईत, अरुण दाभाडे, मंगेश निचत, मुकेश देशमुख, सचिन पोकळे, नारायण थोराईत, आकाश उके, विजय बंड, राजेश ढोबळे, सुरेश बंड, गजानन कडू व अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.