धामणगाव रेल्वे : हैदराबाद ते भोपाळचे अंतर कमी करण्याच्या दृष्टीने निर्मिती होत असलेल्या यवतमाळ ते रिद्धपूरपर्यंतच्या अप्रोच रोडच्या कामासाठी कंत्राटदाराने डांबर प्लांट, गिट्टी क्रशर आदी कारखाने सुरू केल्याने संत्राबागांसह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वारंवार तक्रार करूनही शासनदरबारी दखल घेतली जात नसल्याने १५ मार्च या जागतिक ग्राहक दिनापासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे.
यवतमाळहून बाभूळगाव, देवगाव, धामणगाव रेल्वे मार्गे अंजनसिंगी, कुऱ्हा ते तिवसा व रिद्धपूर अशा १०८ किमी राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. यावर ४५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. या मार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने माल तयार करण्यासाठी जुना धामणगाव लगतच्या मौजा शहापूरमध्ये दगडाची खाण , गिट्टी क्रशर, डांबर प्लांट, सिमेंट प्लांट उभारले आहेत. याला लागून रूपराव भाऊराव मांडवगणे यांचे पत्नीच्या नावे असलेल्या शेतात संत्र्याचे ४०० झाडेसुद्धा आहेत. या प्लांटची राख व धुरामुळे त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वेळोवेळी लेखी तक्रार करूनही प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने अखेर येत्या १५ मार्चपासून उपोषणाला बसणार असल्याचे मांडवगणे यांनी सांगितले.