लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा बाजार/वरूड : संत्रा फळबागांसह मोसंबी फळबागांना अतिवृष्टीमुळे गळती लागली असून, यात मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसला आहे. बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फळबागांना जबर फटका बसल्याचे बोलले जात आहे.
विदर्भाच्या कॅलिफोर्नियात संत्रा फळबागांबरोबर मोसंबी फळबागा येथे अंदाजे आठ ते दहा हजार हेक्टरवर उभ्या आहेत. गेली २० दिवस पावसाची संततधार व सूर्यदर्शन नसल्याने फळबागांना धोका निर्माण झाला. संत्रा व मोसंबी फळांना या संततधार पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने प्रचंड प्रमाणावर संत्रा व मोसंबीची फळे देठापासून गळायला लागल्याने तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान निदर्शनास येत आहे.
वघाळ, काटी, राजुरा बाजार, आलोडा, नांदगाव, हातुर्णा, गाडेगाव, वंडली, भापकी, बेलोरा, लोणी, अमडापूर या गावांच्या शिवारातील संत्रा व मोसंबी फळबागांची अवस्था दयनीय झाली आहे. बागेत गळालेल्या फळांचा सडा पाहायला मिळत आहे. कृषी शास्त्रज्ञांनी तातडीने या बुरशीजन्य रोगास आटोक्यात आणून संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होण्यापासून वाचविण्याची मागणी होत आहे. फळांची गळ एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे की, झाडावर फळ राहतील की नाही, याचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. संत्रा व मोसंबी फळबागांची या अतिवृष्टीमुळे अतोनात हानी झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.
लोकप्रतिनिधींनी या नुकसान झालेल्या बागांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना भरपाईसाठी शासनदरबारी आवाज उठवावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आंबिया बहारची फळगळ ही संततधार पावसामुळे असल्याचे तालुका कृषी अधिकारी अतुल आगरकर यांनी सांगितले.
"मोसंबी झाडावर एवढ्या प्रमाणात अजून गळ पाहिली नाही. झाडावर फळे राहतील की नाही, याची आज शाश्वतीच राहिली नाही. शास्त्रज्ञांनी बांधावर येऊन मार्गदर्शन करावे."- अरुण कुसरे, मोसंबी उत्पादक शेतकरी, गाडेगाव
"पावसाचे सातत्य राहिल्याने येथील संत्रा व मोसंबी फळबागांना जबर फटका बसला आहे. फळे मोठ्या प्रमाणावर जमीनदोस्त होत आहेत. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला. तातडीने सर्वेक्षण व भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे."- सुशांत पाचघरे, संत्रा उत्पादक शेतकरी, लोणी
"सततच्या पावसामुळे संत्रा झाडांची फळ गळती होत असल्याचे चित्र आहे. सततच्या पावसाने संत्रा- मोसंबीवर बुरशीजन्य फायटोप्थेराची लागण होण्याची शक्यता असते. अशावेळी शेतकऱ्यांनी २०० लिटर पाण्यात एक किलो ट्रायकोडर्मा, एक किलो पीएसबी, एक लिटर अॅझेटोबॅक्टर, एक लिटर सुडोमोनस, दोन किलो गूळ, दोन किलो बेसन एकत्र करून झाडाच्या बुंध्याशी तातडीने आळवणी (ट्रेंचिंग) करावी. साचलेले पाणी चर खोदून बाहेर काढावे. गळलेली फळे शेताबाहेर फेकावी."-डॉ. के. पी. सिंह, शास्त्रज्ञ तथा कृषी विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर