अमरावती : आंबट गोड अशा अवीट चवीने सर्वांना भुरळ घालणारा नागपुरी संत्रा सध्या मातीमोल झालेला आहे. भाव पडल्याने व्यापारी फिरकत नाही, स्थानिक बाजारपेठेत उठाव नसल्याने आंबिया बहराची किमान ३० टक्के फळे झाडावरच आहेत व या फळांची मुदत संपली आहे. संत्राला राजाश्रय, प्रोत्साहन अन् निर्यात धोरण नसल्याने उत्पादकांची परवड होत आहे.
राज्यात किमान २ लाख हेक्टरमध्ये संत्राचे उत्पादन घेतले जाते. यातील ९० टक्के उत्पादन प्रामुख्याने अमरावती व नागपूर जिल्ह्यात घेतल्या जाते. पश्चिम विदर्भात ८० हजार हेक्टरमध्ये संत्राचे क्षेत्र आहे. यामध्ये प्रामुख्याने ६० ते ७० टक्के उत्पादक आंबिया बहर घेतात. जानेवारी ते फेब्रुवारीपासून पुढे नऊ महिने असा आंबियाच्या फळांचा कालावधी गृहीत धरला जातो.
आता मुदत होत असल्याने फळ साल सोडण्याची व त्याच्या चवीत थोडा फरक पडण्याची शक्यता आहे व अशा परिस्थितीत भाव १२ ते १५ हजार रुपये टनावर आले आहेत. भाव पडले व स्थानिक बाजारात उठाव नसल्याने किमान ३० टक्के फळे झाडावरच आहेत. त्यामुळे संत्रा उत्पादकांची चिंता वाढली आहे.