अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत लवकरच शाळा बाह्य विद्यार्थ्याची शोध राबविली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रगणक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी १९ मार्च रोजी सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शिक्षकांना दिले.
राज्य शासनाच्या आदेशानुसार शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष शोधमोहीम प्राथमिक शिक्षण विभागामार्फत राबविली जाणार आहे. अशातच सध्या कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणक शिक्षकांची कोरोना चाचणी २० ते २२ मार्च कालावधी संबंधितांनी कोरोना चाचणी संबंधित केंद्रावर जाऊन गर्दी न करता व नियमांचे पालन करून चाचणी करून घ्यावी, अशा सूचना पत्राव्दारे दिल्या आहेत. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनी गटशिक्षणाधिकारी यांना लेखी आदेश देऊन संबंधित प्रगणक शिक्षकांना याबाबत सूचना दिल्या आहेत.