- गणेश वासनिकअमरावती : येथील मॉडेल रेल्वे स्थानकावरील तिकीट आरक्षण कक्षाच्या पर्यवेक्षकपदी कार्यरत शीला नंदनवार यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याप्रकरणी त्यांना बडतर्फ करण्यात आले. मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांनी मुंबई उच्च न्यायालयीच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे रेल्वेत जात चोरीप्रकरणी शुद्धीकरण होत असल्याचे चित्र आहे.सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी रेल्वेत जात चोरून नोकरी बळकावणारे अधिकारी, कर्मचा-यांच्या जात पडताळणीचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने मध्य रेल्वे मुंबई विभागाने अनुसूचित जाती, जमातीच्या कर्मचा-यांना मूळ कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात नोटिशी बजावल्या होत्या. त्यानुसार भुसावळ रेल्वे विभागांतर्गत १९, तर नागपुरात १७ बोगस जात प्रकरणांची चौकशी आरंभली होती. अमरावती रेल्वे स्थानकावर प्रारंभी वाणिज्य लिपिकपदी रुजू झालेल्या शीला नंदनवार या मूळ कोष्टी संवर्गाच्या असताना त्यांनी हलबी संवर्गाचे जात प्रमाणपत्र रेल्वे विभागाकडे सादर करून अनुसूचित जमाती संवर्गात लाभ घेतला.या प्रकरणाची तक्रार रेल्वेचे सेवानिवृत्त अधिकारी नंदराज मघाळे यांनी अमरावतीच्या विभागीय अनुसूचित जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. त्यानुसार एसटी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नंदनवार यांची कागदपत्रे तपासली तेव्हा त्या हलबी संवर्गात येत नसल्याचा निर्णय समितीने दिला होता. मात्र, समितीच्या निर्णयाला शीला नंदनवार यांनी आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायासाठी धाव घेतली. परंतु नागपूर खंडपीठाने देखील शीला नंदनवार यांनी जात चोरी केल्याचा ठपका ठेवत त्यांची याचिका फेटाळली. शीला नंदनवार या हलबी नसून कोष्टी संवर्गात असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला.उच्च न्यायालयाने सदर आदेश मध्य रेल्वे मुंबईच्या वरिष्ठांकडे पाठविले. त्याअनुषंगाने भुसावळ मध्य रेल्वे विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी शीला नंदनवार यांना पदावरून बडतर्फ करण्याचे आदेश ८ नोव्हेंबर २०१७ रोजी जारी केले. या आदेशाची अंमलबजावणी अमरावती रेल्वे स्थानकाचे प्रबंधक आर.टी. कोटांगळे यांनी सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी केली असून नंदनवार यांना पदावरून बडतर्फ करण्याची कार्यवाही केली आहे.अन्य ३५ बोगस अधिका-यांचे काय?बोगस जात प्रमाणपत्र तयार करून त्याआधारे रेल्वेत नोकरी बळकावली आहे. यात अमरावतीत १९, तर नागपुरात १७ जणांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना बनावट अधिकारी, कर्मचारी कसे कार्यरत राहतात, हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे. शीला नंदनवार हे नाममात्र उदाहरण असून अनेक बड्या पदावर जात चोरून अधिकारी खुर्चीवर कायम असल्याची खंत तक्रारकर्ते नंदराज मघाळे यांनी व्यक्त केली.वरिष्ठांच्या आदेशानुसार तिकीट आरक्षण पर्यवेक्षक शीला नंदनवार यांना बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठांचे हे आदेश ९ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाले होते.- आर. टी. कोटांगळे,रेल्वे स्टेशन प्रबंधक, अमरावती
रेल्वेत बोगस जात चोरीप्रकरणी शुद्धीकरणास प्रारंभ, उच्च न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 4:00 PM