अमरावती : गुंतवणूकदारांची रक्कम हडपणे व सेवेत त्रुटीचा ठपका ठेवून ग्राहकाला 11 लाख 20 हजार रुपये व त्यावर नऊ टक्के व्याज देण्याचे आदेश ग्राहक तक्रार निवारण मंचाने श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंटला दिले आहे. या निर्णयामुळे तक्रारकर्त्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
देवरणकर नगरातील रहिवासी नरेश कन्हैयालाल फुलाडी (65) व निर्णय नरेश फुलाडी (30) यांनी मुकुंद पितळे (रा. पूजा कॉलनी) या मित्राच्या माध्यमातून श्रीसूर्या इन्व्हेस्टेमेंटचा संचालक समीर सुधीर जोशी व पल्लवी समीर जोशी यांच्याकडे 2011 ते 2013 दरम्यान एकूण 13 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. मुदत संपल्यानंतरही श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंटकडून गुंतवणूक रक्कम व व्याज मिळाले नव्हते. त्यामुळे तक्रारकर्त्याला आर्थिक हानी तसेच शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. याबाबत नरेश फुलाडी व निर्णय फुलाडी यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली. 23 नोव्हेंबर 2015 रोजी हे प्रकरण ग्राहक मंचात दाखल झाले. ग्राहक मंचात दोन्ही पक्षांकडून आपआपली बाजू मांडण्यात आली. दोन्ही बाजंूची पडताळणी करून ग्राहक मंचने तक्रार अंशत: मंजूर केली. अध्यक्ष सुदाम देशमुख, सदस्य शुभांगी कोंडे व दीप्ती बोबडे यांनी हा निर्णय दिला.
श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंटच्या संचालकाने तक्रारकर्त्याला 11 लाख 20 हजार रुपये आणि त्यावर नऊ टक्के व्याज द्यावे, मुदत पूर्ण झाल्याच्या कालावधीपासून ती रक्कम हाती पडेपर्यंत व्याज द्यावे, आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई रक्कम 25 हजार रुपये द्यावे, तक्रार खर्च पाच हजार रुपये द्यावा, 30 दिवसांच्या आत या आदेशाचे पालन करावे, असा निर्णय ग्राहक मंचने दिला. तक्रारकर्त्यातर्फे वकील एन.सी.फुलाडी यांनी बाजू मांडली.