अमरावती : आगामी शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मार्चअखेरपर्यंत पाठ्यपुस्तकाची मागणी ई-बालभारती पोर्टलवर नोंदविण्याचे आदेश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी महापालिकांचे प्रशासन अधिकारी विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी याबाबत कारवाईच्या सूचना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, शासन अनुदानित शाळा यासाठी मोफत पाठ्यपुस्तकांचा उपक्रम राबविण्यात येतो. प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते पाचवीसाठी प्रतिविद्यार्थी २५० रुपये, उच्च प्राथमिक शाळा इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतसाठी प्रतिविद्यार्थी ४०० रुपये निधीची तरतूद आहे. दरवर्षी गतवर्षाचे यू-डायस डाटानुसार पाठ्यपुस्तक मागणी करण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ सुरू होण्यापूर्वी पोर्टलवर पाठ्यपुस्तकाची मागणी नोंदवून त्याचा पुरवठा मुदतीत करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याच्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकात मोफत पाठ्यपुस्तकासाठी निधी मंजूर होण्याच्या अधीन राहून पाठ्यपुस्तके वाटप होणार आहे. शैक्षणिक वर्षातील शिल्लक पाणी पुस्तके व पुन्हा वापरासाठी उपलब्ध पुस्तके मूळ मागणीतून वगळावी लागणार आहेत.
बॉक्स
मागणी वेळेत नोंदवा
२०२० मधील यू-डायस प्लसमधील माध्यम व इयत्तानिहाय विद्यार्थीसंख्या मागणीपेक्षा कमी असल्यास संबंधित जिल्ह्यांना त्याप्रमाणे पुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तकांची मागणी वेळेत नोंदविल्यास व पुरवठा विलंबाने झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांवर राहणार असल्याचेही आदेशात स्पष्ट केले आहे.