अमरावती : जिल्हा परिषद शाळास्तरावर पीएफएमएस प्रणालीसाठी असलेले राष्ट्रीयीकृत बँकेतील खाते यापूर्वी बंद करण्याचे प्राथमिक शिक्षण परिषद बजावले होते. आता मात्र पुन्हा हे बँक खाते एचडीएफसी बँकेत तातडीने उघण्याबाबतचे आदेश २७ जुलै रोजी दिले आहेत. या संदर्भातील लेखी पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे धडकले आहे.
समग्र शिक्षा अभियानअंतर्गत शाळांना शाळा अनुदान व गणवेश अनुदान दरवर्षाला दिले जाते. समग्र शिक्षा अंतर्गत २०२२-२३ करीता प्रत्येक शाळेला १० हजार, १५ हजार आणि २० हजार पटसंख्येनुसार वर्षभर खर्च करण्यासाठी दिला जात होता. तो निधी महाराष्ट्र बँकेत शाळांच्या खात्यावर टाकण्यात येत होता. शिक्षक संचालकांनी शाळांचे खाते एचडीएफसी बँकेत काढण्याचे आदेश दिले. आणि महाराष्ट्र बँकेत जमा झालेले शाळा अनुदान व गणवेश अनुदान ३० सप्टेंबरला शासनाने परत घेऊन ते खाते झीरो केले. अशातच पीएफएमएस प्रणालीमुळे सर्व अडचणी येत असल्याने ही प्रणाली बंद करून जुनीच पद्धत सुरू करावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. त्यामुळे आता पुन्हा समग्र शिक्षा अभियानचे शाळा खाते आता एचडीएफसी बँकेत काढण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिले आहे. याबाबतचे आदेश गुरुवार २७ जुलै रोजी झेडपीत धडकलेत. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी सर्व शाळांना आता पुन्हा एचडीएफसी बँकेत खाते काढण्याची लेखी सूचना २८ जुलै रोजी जिल्हाभरातील शाळांना दिल्या आहेत. एचडीएफसी या बँकेच्या शाखा ग्रामीण भागात नाही. शहरात किंवा काही तालुकास्तरावर आहेत. मग शाळांनी कोठे खाते काढावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण भागात आहे. यापूर्वी नॅशनल बँकेत असलेले सर्व शिक्षा अभियानाचे खाते बंद करून मागील वर्षी ते महाराष्ट्र बँकेत काढायला लावले. आता ते बंद करून एचडीएफसी बँकेत काढायला लावले आहेत. वारंवार खाते बदलामुळे मुख्याध्यापकांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी राजेश सावरकर यांनी दिली.