अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या तब्बल दोन वर्षांनंंतर राज्यातील ३ हजार ९४३ शिक्षकांच्या २२ ऑगस्ट रोजी आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचा अपवाद सोडला, तर बहुतांश जिल्हा परिषदांनी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले नव्हते. ही बाब लक्षात घेता ग्रामविकास विभागाने बदली झालेल्या शिक्षकांना येत्या ५ सप्टेंबर रोजी कार्यमुक्त करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले. यासंदर्भातील आदेश ३० ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेत धडकताच शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
कोरोना संकटाची दोन वर्षे आणि नंतर शिक्षकांच्या बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार न झाल्याने शिक्षकांच्या बदल्या लांबल्या होत्या. आता २२ ऑगस्ट रोजी दाेन वर्षांच्या अवधीनंतर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. यानुसार राज्यातील ३ हजार ९४३ शिक्षकांच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे बदल्या केल्या आहेत. यात मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा समावेश आहे. बदल्या झालेल्या शिक्षकांना पुणे जिल्हा परिषदेने बदली झालेल्या शिक्षकांना ७ एप्रिल २०२१ च्या शासननिर्णयानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी तालुकास्तरावर करून कार्यमुक्त करण्याचे आदेश सीईओंनी दिले होते.
हा अपवाद सोडला, तर बहुतांश जिल्हा परिषदांना आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केलेले नाही. त्यामुळे याची दखल घेत ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची कारवाई करावी, अशा सूचना लेखी पत्राद्वारे सीईओंना दिल्या आहेत. ही सर्व प्रक्रिया ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी. शिक्षकांना कार्यमुक्त करताना प्रचलित धोरणानुसार १० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त राहणार नाहीत, याची दक्षतासुद्धा बाळण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या पत्रात दिलेल्या आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना ५ सप्टेंबरपर्यंत कार्यमुक्त केले जाणार असल्याने दिलासा मिळाला आहे.