अमरावती : ब्रेन डेड अवस्थेतील मुकेश अमृतलाल पिंजानी यांचे हृदय, यकृत व मूत्रपिंड सोमवारी दुपारी एअर अॅम्ब्युलन्सने मुंबई व नागपूरला पाठविण्यात आले, तर नेत्रदानानंतर नेत्रपटल जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रविभागात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्याकरिता बेलोरा विमानतळ व नागपूरपर्यंत ‘ग्रीन कॉरिडॉर’ देण्यात आला होता. अमरावती शहरातून तिस-यांदा मानवी अवयवांची गरजू रुग्णांकरिता पाठवण्यात आले असून सोमवारी भारतीय अवयवदान दिनीच या चौघांना जीवदान मिळाले. मुंबई व नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात अवयव दानासाठीची शस्त्रक्रिया पार पडली. डॉ. अरुण हरवाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपुरी कॅम्प येथील रहिवासी मुकेश अमृतलाल पिंजानी (३३) १९ नोव्हेंबर रोजी मिरगी आल्याने खाली कोसळले. त्यांच्या लहान मेंदूला मार लागला. त्यांचे ब्रेन डेड झाल्याचे निदान झेनिथ हॉस्पिटलमध्ये झाले. अवयव दानासंदर्भात कुटुंबीयांनी इच्छा दर्शविली. किडनीतज्ज्ञ डॉ. अरुण हरवाणी यांनी तत्काळ ‘झोनल आॅर्गन ट्रान्सप्लान्ट कमिटी’चे को-आॅर्डीनेटर रवि वानखडे यांना माहिती दिली. वानखडे यांनी मुंबई येथील आरोग्य सेवा विभागाच्या संचालक गौरी राठोड यांच्याशी संपर्क करून सोमवारी अवयव मुंबई व नागपूर येथे पाठविण्याची तयारी केली. किडनीदानाविषयी समन्वयक नवनाथ सरवदे, यकृत समन्वयक सिजू नायर, समन्वयक पंकज बन्सोड यांनीही अवयवदान प्रक्रियेत समन्वयकाची भूमिका निभावली.
मुंबईच्या शल्यचिकित्सकांची चमू अमरावतीतया शस्त्रक्रियेसाठी मुंबई येथील डॉ. सतीश जावली, विजय शेट्टी, संदीप सिन्हा, संतोष सोरटे, ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ.स्वप्निल शर्मा व नागपूरचे डॉ. अश्विनी खांडेकर, नीरज राघाणी अमरावतीत पोहोचल्या. सकाळी ११ वाजता सुरू झालेली शस्त्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत चालली. मुकेश यांचे हृदय, यकृत व मूत्रपिंड कॉर्डियाक अॅम्ब्युलन्सद्वारे बेलोरा विमानतळापर्यंत पाठविण्यात आले. यादरम्यान शहरातील रस्त्यांवर ‘ग्रीन कॉरिडॉर’ देण्यात आला. अमरावती शहर पोलिसांनी यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. विमानतळाहून एअर अॅम्ब्युलन्सद्वारे हृदय मुंबईच्या फोर्टीस हॉस्पिटलला तर यकृत परेल येथील ग्लोबल हॉस्पिटलला रवाना करण्यात आले. दोन्ही किडनी नागपूर येथील केअर व सुपर हॉस्पिटल ग्रिन कॉरिडॉरच्या माध्यमातून खासगी वाहनाने पाठविण्यात आल्या. मुकेश पिंजानी हे कापड व्यावसायिक होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा आप्तपरिवार आहे. ‘ग्रीन कॉरिडॉर’ची जबाबदारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, पीएसआय विजय चव्हाण, पोलीस शिपाई विनोद राठोड, राजूू बर्वे यांनी पार पाडली. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या सूचनेनुसार पोलीस दलाने ‘ग्रीन कॉरिडॉर’साठीची कामगिरी बजावली.
नेत्रपटल सुरक्षित मुकेश पिंजानी यांचे नेत्रदानही करण्यात आले असून त्यांचे नेत्र हरिना नेत्रदान समितीच्या माध्यमातून जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रदान विभागात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. आवश्यकतेनुसार ते गरजू रुग्णाला लावले जाणार असल्याची माहिती हरिना नेत्रदान समितीच्या पदाधिकाºयांनी दिली. यांचे मोलाचे सहकार्यअवयवदान प्रक्रियेत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. झेनिथ हॉस्पिटलचे डॉक्टर्स, परिचारिका व सामाजिक क्षेत्रातील सुरेंद्र पोपली, चंद्रकांत पोपट यांचाही मदतकार्यात सहभाग होता.
अवयवदानाचा सर्वोत्कृष्ट निर्णय घेणा-या पिंजानी परिवाराचे उत्कट सहकार्य लाभले. त्यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला. नागरिकांनीही अवयनदानाचे महत्त्व समजून पुढे येणे गरजेचे आहे. - डॉ. अरुण हरवाणी, किडनी तज्ज्ञ, अमरावती