गजानन मोहोड
अमरावती : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी हजारो कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत शासनाचे लक्ष वेधले. सर्व शासकीय संघटनांच्या हजारोंच्या संख्येने निघालेल्या मोर्चाची ऐतिहासिक अशी नोंद झाली. मोर्चात महिलांचा सर्वाधिक सहभाग उल्लेखनीय ठरला.
जिल्ह्यात वर्ग ३ व ४ मधील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाचे कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर गेले आहे. संपाच्या चवथ्या दिवशी सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातून सर्व विभागाच्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. नेहरू मैदानातून निघालेल्या मोर्चाचे एक टोक इर्विन चौकात होते तर दुसरे टोक जयस्तंभ चौकात एवढी प्रचंड उपस्थिती मोर्चात होती. या व्यतिरिक्त प्रत्येक चौकात कर्मचारी समूहाने उपस्थित होते. ते मोर्चात सहभागी झाले.
या विराट मोर्चाने शहरातील वाहतूक एक ते दीड तासापर्यंत विस्कळीत झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी पुन्हा जुन्यापेन्शनसह इतरही प्रलंबित मागण्यांचा नारा बुलंद करण्यात आला.