पत्रपरिषद : खोडके मेमोरियल ट्रस्ट शोध प्रतिष्ठानचा उपक्रमअमरावती : प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट व शोध प्रतिष्ठानच्या विद्यमाने २५ ते २७ जानेवारी दरम्यान सांस्कृतिक महोत्सव २०१६ चे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ट्रस्टच्या अध्यक्षा सुलभा खोडके यांनी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली. या सांस्कृतिक महोत्सवामध्ये विदर्भस्तरीय पुष्प प्रदर्शनी, स्पर्धा, बचत गट उत्पादीत वस्तुंची प्रदर्शनी, पुस्तक प्रदर्शनी, विदर्भस्तरीय हिंदी व मराठी खुली सीनेगीत स्पर्धा, गझल मैफील आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक महोत्सवात समूह न्यूत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे नवोदीत कलावंतांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे त्यांनी सांगितले. याच महोत्सवात सिद्धीविनायक महिला बचत गट पतसंस्था व बचतगट महासंघाचेवतीने बचतगटातील उत्पादीत वस्तुंची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. तसेच शोध प्रतिष्ठान अमरावती व ग्रंथांची प्रकाशन मुंबई यांच्या विद्यमाने पुस्तक प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. सुरेश भट गझल मंच पुणेद्वारा मराठी गझल मुशायरा आयोजित आहे. यामध्ये चित्तरंजन भट, सुशांत खुराडे, प्रमोद खराडे, सुधीर मुळीक, सतीश दराडे, अमीत वाघ, प्रकाश मोरे, किशोर भूगल आदी गजल सादर करणार आहे. संचालन शाहीर सुरेश वैराळकर करणार आहेत. यासोबतच स्थानिक कलावंतांचा आर्केस्ट्रा कला अविष्कार कार्यक्रमांचे देखील आयोजन असल्याचे सुलभा खोडके यांनी सांगितले. पत्रपरिषदेला महापौर रिनानंदा, किशोर शेळके, अविनाश मार्डीकर, चेतन पवार, अमर बांबल, सुचिता खोडके, सी.एम. देशमुख, अे.आर. देशमुख, रेखा मग्गीरवार व संतोष गिरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सांस्कृतिक महोत्सव २०१६ चे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2016 12:29 AM