- संजय खासबागेवरूड (अमरावती) : संत्रा महोत्सव केवळ विदर्भातच न घेता राज्याच्या कानाकोप-यात भरवावा. यातून शेतक-यांचे आर्थिक हित जोपासून संत्र्याला सुगीचे दिवस येतील. या आयोजनासाठी ज्या संस्था पुढे येतील त्यांना मदत केली जाईल, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.वरूड येथे आयोजित कृषी विकास परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बोंडे, मुलताईचे(म.प्र.) आमदार चंद्रशेखर देशमुख, नगराध्यक्ष स्वाती आंडे, रुपेश मांडवे, जि.प.सदस्य संजय घुलक्षे, सारंग खोडस्कर, अनिल डबरासे, अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मीना, कमलाकर देशमुख, सैयद सलीम अहमद, योगेश थोरात उपस्थित होते. कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शेतीच्या समस्या समजून घेऊन किमान एक वर्षे ग्रामीण भागात सेवा देण्याचे आवाहन ना. देशमुख यांनी केले. समारोपीय कार्यक्रमात आ. बोंडे म्हणाले, चार भिंतीच्या आड लपलेले तंत्रज्ञान शेतक-यांना मिळण्यासाठी कृषी विकास परिषदेचे आयोजन आहे. यातून उत्पन्न वाढीसाठी मदत होईल. अपूर्ण सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. शेतक-यांना वीज मिळावी, यासाठी गव्हानकुंड येथे २५ मेगावॅटचा वीजप्रकल्प कार्यान्वित होणार आहे. या कृषी विकास परिषदेला शेतक-यांचा मोठा प्रतिसाद लाभला.
संत्रा महोत्सवाचे आयोजन राज्याच्या कानाकोप-यात व्हावे- सुभाष देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 8:51 PM