फोटो पी ३१ मोशीर् फोल्डर
मोर्शी : तालुक्यातील डोमक, आष्टोली, रायपूर येथे रविवारी अवकाळी पावसाने तांडव घातला. झाडे, घरे, विजेचे खांब कोसळले, तर काही गावे काळोखात बुडाली.
डोमक येथे ३० मे रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने अनेकांच्या घरावरची छपरे उडून गेली. इतकेच नाही तर डोमक ते कोळविहीर रस्त्यावर अनेक झाडे मुळासह उन्मळून पडल्याने डोमक जाणारा रस्ता बंद पडला आहे. कोळविहीर ते तरोडा रस्त्याची वाहतूकसुद्धा विस्कळीत झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याचे प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले. या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली. विजेच्या तारा तुटून पडल्यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या अवकाळी वादळी पावसामुळे महावितरणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गावातील शेतकरी सदानंद कोंडे, रेखा कोंडे, विशाल कोंडे, सागर कोंडे, प्रवीण कोंडे, पुरुषोत्तम कोंडे, पीयूष कोंडे व अन्य गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या जोरदार वादळी वाऱ्यामुळे विजेचे लोखंडी खांब वाकले असून, सिमेंटचे खांब तुटून पडले. डोमक येथे २० घरांची पडझड झाली असून, जवळपास १७ शेतकऱ्यांचे मोसंबी, संत्रा व लिंबाची झाडे उन्मळून पडली.
तालुक्यातही प्रचंड नुकसान
तरोडा येथील पाच घरे जमीनदोस्त झाली. सात शेतकऱ्यांचे संत्रा, मोसंबी, लिंबाची झाडे उन्मळून पडली. आष्टोली येथील ८ ते १० घरांची पडझड झाली. सात ते आठ शेतकऱ्यांची संत्रा, मोसंबीची झाडे उन्मळून पडली. गावकऱ्यांनी याबाबतची माहिती महसूल प्रशासनाला दिली.
महसूलकडून पंचनामा
माहिती मिळताच आमदार देवेंद्र भुयार, महसूल प्रशासनाच्यावतीने तहसीलदार सिद्धार्थ मोरे, नायब तहसीलदार विठ्ठल वंजारी, मंडळ अधिकारी राजेश संतापे, तलाठी पठाण, पोलीस पाटील, कृषिसहायक यांनी वादळामुळे नुकसान झालेल्या घरांची व शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करून पंचनामा करण्यात आला.