अंजनगाव सुर्जी (अमरावती) : बरेली येथे तैनात असलेल्या आणि भांबोरा येथील मूळ रहिवासी लष्करातील जवानाविरुद्ध खल्लार पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अत्याचारपीडित १६ वर्षांची अल्पवयीन युवती असून, ती सहा महिन्यांची गर्भवती आहे. महिला व बाल कल्याण समितीच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गजानन बबनराव रिठे (२६, रा. भांबोरा) असे गुन्हा दाखल झालेल्या जवानाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील बरेली येथे तैनात आहे. तो जून २०१७ मध्ये आपल्या घरी सुटीवर आला होता. त्याच गावातील अल्पवयीन युवतीच्या घरात शिरून त्याने पिण्यास पाणी मागितले आणि घरात कोणी नसल्याचे पाहून शारीरिक अत्याचार केले. पुन्हा दोन-तीन दिवसांनी तिच्या घरात प्रवेश करून त्याने आपली वासना शमविली. या घटनेबाबत कुणाला काही सांगितल्यास समाजात तुझी बदनामी करेन व जिवे मारून टाकेन, अशी धमकीही त्याने दिली. आजोबांकडे असलेल्या अल्पवयीन युवतीचे पोट काही दिवसांपासून दुखत असल्याने तिला एका खासगी दवाखान्यात नेले असता, डॉक्टरांनी ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान केले. तिच्या आजोबांना हा मोठा धक्का होता. अखेर त्या मुलीला बालकल्याण समितीच्या आधारे बाल सुधारगृहात ठेवण्यात आले. त्यानंतर महिला-बाल कल्याण समितीने या घटनेची दखल घेऊन खल्लार पोलीस ठाण्याला पत्र देऊन आरोपीवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राहुल चौधरी यांच्या तक्रारीवरून गजानन रिठे याच्याविरुद्ध भादंविचे कलम ४५२, ३७६, पोस्को ६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणाचा तपास ठाणेदार शुभांगी आगाशे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल चौधरी, महिंद्र साखरे, राजेंद्र व्यवहारे, संतोष राठोड करीत आहेत.
मुलगी आली होती आजोबांकडे आश्रयालाअल्पवयीन युवतीचे आई-वडील वारल्यामुळे ती आजोबांकडे आश्रयाला आली होती. या अगतिकतेचा फायदा गजाननने उठविला आणि बदनामीच्या भीतीपोटी ती गप्प राहिली.
तपास पथक तयार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर त्यांना आरोपीला अटक करण्यासाठी रवाना केले जाईल.- शुभांगी आगाशे, ठाणेदार, खल्लार