आयुक्त ‘रॉक’ : पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याची तंबी लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : निर्धारित वेळापत्रकानुसार कर्मचाऱ्यांची हजेरी तपासण्यात कुचराई करणाऱ्या विभागप्रमुखांवरही आयुक्तांची नजर राहणार आहे. काही विभागप्रमुख नेमून दिलेल्या विभागांना भेटीही देत नाहीत आणि त्याबाबतचा अहवाल आयुक्त कार्यालयाला पाठवीत नसल्याचे निरीक्षण आयुक्त हेमंत पवार यांनी नोंदविले असून यापार्श्वभूमिवर अशा अधिकाऱ्यांची एक दिवसाची वेतन कपात का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. याबाबत समाधानकारक खुलासा न दिल्यास अधिकारी-कर्मचाऱ्यांची एक दिवसाची वेतन कपात केली जाईल.उपअभियंता रवींद्र पवार यांचे निलंबन आणि कनिष्ठ लिपिक उमेश फतवाणी यांची एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरूपी थांबविल्यानंतर आयुक्त हेमंत पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशासकीय शिस्तीला गालबोट लागू नये, यासाठी ते प्रयत्नशिल असले तरी अधिनस्थ यंत्रणेतील काही जण त्यांना जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचेवर आयुक्तांनी कारवाईचा दंडुका उगारला आहे. तर विनापरवानगी मुख्यालय सोडणाऱ्या कार्यकारी अभियंता विजयसिंग गहरवार यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, यासाठी एप्रिलमध्ये आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी तपासण्याची जबाबदारी अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली होती. आठवडाभरात कोणत्या अधिकाऱ्याने कोणत्या विभागाला भेट देऊन हजेरी तपासायची, याबाबत वेळापत्रक आखून दिले होते. त्यानुसार सुरूवातीचे काही दिवस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वेळापत्रकानुसार कर्मचाऱ्यांची हजेरी तपासली. त्यासाठी संबंधित विभागात सकाळी १० ला हजेरी सुद्धा लावली. त्याचा अहवाल न चुकता दुपारी १२ च्या आत आयुक्तांच्या स्वीय सहायकांकडे पोहोचू लागला. मात्र, त्यानंतर हळूहळृ अनेक विभागप्रमुखांनी हजेरी तपासण्याच्या कार्याला हरताळ फासला. ही बाब आयुक्तांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी संबंधित विभागप्रमुखांना खडसावले आणि त्यानंतर हजेरी तपासण्याच्या कार्यात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांना एक दिवसाच्या वेतनकपातीची तंबी दिली.नियमांचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाईकार्यकारी अभियंता विजयसिंग गहरवार हे २३ जूनला वरिष्ठांची अनुमती न घेता खासगी कामासाठी मुख्यालयाबाहेर होते. ही बाब कार्यालयीन शिस्तीला अनुसरून नसल्याने क ोणत्याही विभागप्रमुखाने आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेश सोमवारी नव्याने काढण्यात आले आहेत. असे आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबी आयुक्तांनी दिली आहे. निलंबनाबाबत कुठलीही पूर्वसूचना देण्यात येणार नाही, असेही बजावण्यात आले आहे.
-तर विभागप्रमुखांचीही वेतनकपात
By admin | Published: June 28, 2017 12:17 AM