शेखर भोयर यांचा इशारा : ‘तत्त्वत:’ शब्दामुळे शिक्षक संभ्रमात अमरावती: विना अनुदानित शाळांना १ जूनपासून २० टक्के अनुदान देण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वत: मान्यता दिली असली तरी या ‘तत्त्वत:’ शब्दाने राज्यभरातील शिक्षकांना संभ्रमात टाकले आहे. हा निर्णय म्हणजे शिक्षकांवर अन्याय करणारा असून घोषित व अघोषित शाळा अनुदानाचा अधिकृत शासन निर्णय एकाच वेळी जाहीर करण्यात आला नाही तर पुढील आठवड्यात विभागातील ३०० शिक्षक आत्मदहन करतील, असा इशारा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शेखर भोयर यांनी दिला आहे.येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात गत १५ दिवसांपासून विना अनुदानित शाळा शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरु आहे. या आंदोलनाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शेखर भोयर यांनी अनुदानास पात्र ठरलेल्या घोषित शाळांना २० टक्के तत्त्वत: अनुदान मान्य करुन शासनाचे शिक्षकांचे आजचे मरण उद्यावर नेल्याचा आरोप त्यांनी केला. ‘तत्त्वत:’ शब्द हा शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाचा बैठकीत घोषित आणि अघोषित शाळांच्या अनुदानाचा अधिकृत शासन निर्णय जाहीर करणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास अमरावती विभागातील ३०० शिक्षक बुधवारी २२ जून रोजी विनोद तावडे यांच्या घरासमोर आत्मदहन करतीेल, असे महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने शेखर भोयर यांनी दिला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे हे खोटारडे मंत्री असल्याचा आरोप शेखर भोयर यांनी केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे दिलीप कडू, राज्य विना अनुदानित कृती समितीचे सुधाकर वाहुरवाघ, सुरेश सिरसाट, गाजी जहरोश, बाळकृष्ण गावंडे, पुंडलिक रहाटे, दीपक धोटे, गोपाल चव्हाण, आदी उपस्थित होते.आता बेमुदतऐवजी साखळी उपोषणविना अनुदानित शाळा कृती समितीच्यावतीने १ जूनपासून शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात शिक्षकांचे अनुदान मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरु आहे. मात्र, १५ जूनपासून मागण्या पूर्ण होईस्तोवर बेमुदतऐवजी साखळी उपोषण करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे. मात्र, आंदोलन सुरूच राहिल, असे कृती समितीने स्पष्ट केले आहे.ही तर शिक्षणमंत्र्यांची मग्रुरी- संजय खोडकेविना अनुदानित शाळांच्या अनुदानासंदर्भात मंगळवारी काही दूरचित्रवाहिन्यांवर मंगळवारी चर्चा घडवून आणल्या गेली. या चर्चेत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षकांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. हा प्रकार म्हणजे शिक्षणमंत्र्यांची मग्रुरी होय, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी केला. शिक्षणमंत्री तावडे यांनी स्वत: सभागृहात विना अनुदानित शाळांचे प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला आहे, हे विसरता कामा नये. २० टक्के अनुदान मान्य करताना तत्वत: हा शब्द टाकल्याने गुंता वाढविला आहे. शिक्षकांसाठी हा संघर्ष सोपा नाही. त्यामुळे एकजुटीने लढा कायम ठेवावा लागेल, असे खोडके म्हणाले.
अन्यथा विभागातील ३०० शिक्षकांचे आत्मदहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2016 12:28 AM