- गणेश वासनिक अमरावती - राजकारणात महत्त्वाकांक्षा ही नात्यांच्या, तत्त्वांच्या वर जात आहे, तो आम्हाला अनुभव नाही. ज्यांचा फार मोठा संस्थांचा व्याप असतो, त्यांना आमदार किंवा खासदारकीशिवाय जगणं अशक्य असतं. संस्था जगवणं शक्य असतं. आमचं तर ‘जीना यहां, मरना यहां’ हे धोरण आहे. हर्षवर्धन पाटील आणि आमच्यात काहीही राग नाही. हर्षवर्धन पाटील यांना भाजपने खूप काही दिले आहे, अशी टीका राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी येथे केली.
मंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती दौऱ्यावर आले असता अंबादेवी, एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केल्याबाबत टीका केली. मंत्री पाटील यांच्या मते, हर्षवर्धन पाटील यांना अमित भाईंनी आणि देवेंद्र फडणविसांनी खूप प्रेम केले आहे. मात्र हर्षवर्धन पाटलांचे दरवेळीप्रमाणे मी, माझ्या लोकांना विचारून निर्णय घेतला, असे म्हणणे योग्य नाही. शेवटी निर्णय आपण आपला करत असतो आणि लोकांना समजून सांगत असतो. नेत्यांची व्याख्या हीच जो ‘नेतो’ आणि लीडरची व्याख्या म्हणजे तो ‘लीड’ करतो, असा टोला देखील त्यांनी हर्षवर्धन पाटलांना लगावला. यावेळी माजी महापौर चेतन गावंडे, भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी आदी उपस्थित होते. ...तर औषध द्यायलाही कुणी शिल्लक राहिले नसतेराजकारणातच नाही तर जिवंत माणसाच्या जीवनामध्ये कालचक्रही फिरत असतात. २०१९ ला ही स्थिती आमची होती. हा आला, तो आला, तो आला. भाजपकडे पुष्कळ रांग होती. पण, विश्वासघाताने नंतर आमचे सरकार गेले. सरकार जर गेलं नसतं तर त्यांच्याकडे औषध द्यायलाही शिल्लक कुणी राहिले नसते. सगळी काँग्रेस, राष्ट्रवादी झाडून आमच्याकडे आली असती, असा दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.