अमरावती : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने महापालिकेवर बुधवारी मोर्चा काढण्यात आला. ‘वेतन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘झालाच पाहिजे, झालाच पाहिजे आमचा पगार झालाच पाहिजे’ अशा गगनभेदी घोषणा देवून शिक्षकांनी परिसर दणाणून सोडला.आयुक्त अरुण डोंगरे यांच्याशी चर्चा करताना शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गोपाल कांबळे, सचिव योगेश पखाले, संध्या वासनिक, प्रकाशचंद्र आराध्य, योगिनी राऊत, सीमा ठाकूर, वनिता सावरकर, ज्योती मदने, अ. जमील अ. जब्बार, दा. रा. सावरकर आदींनी नियमित वेतन अदा करण्याची मागणी पोटतिडकीने लावून धरली. स्थानिक अंबापेठ येथील शिक्षण कार्यालयातून निघालेला मोर्चा हा महापालिकेत दाखल झाला. पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. शिक्षकांचे वेतन महापालिका आणि राज्य शासन असे संयुक्तपणे ५० टक्के अनुदान देवून अदा करते. मात्र दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसून कपातीची रक्कम कोठे वळती केली जाते, याची माहिती शिक्षकांना दिली जात नाही, असा आक्षेप नोंदविण्यात आला. त्यामुळे दरमहा ५ तारखेच्या आत शिक्षकांचे वेतन मिळावेत, वेतनातून कपात होणारी रक्कमेच्या हिशोब देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात उद्धव ठाकरे, जफरुल्ला खान, विजय घुंडीयाल, रोशन देशमुख, मुजफ्फर अहेमद, तानाजी केंदे्र, श्रीकृष्ण ठाकूर आदी उपस्थित होते.
वेतन आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे!
By admin | Published: March 26, 2015 12:07 AM