जितेंद्र दखणे, अमरावती : राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात येते. तसेच सापडलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. यंदाही प्राथमिक शिक्षण संचालकांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे ५ ते २० जुलै यादरम्यान सर्वेक्षण केले जाणार आहे. याच अनुषंगाने शुक्रवार, २८ जून रोजी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली. यावेळी शिक्षणाधिकारी, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यासह राज्यात विविध कारणांमुळे बालके शाळाबाह्य होत असतात. तसेच विविध प्रकारच्या कामानिमित्त कामगारांचे वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर होत असते. अशा शाळाबाह्य होणाऱ्या व स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या बालकांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून शिक्षण अबाधित राखण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पाच ते २० जुलै यादरम्यान सर्वेक्षण राबविण्याचे निश्चित केले आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण हे महत्त्वपूर्ण सामाजिक काम केवळ शासनाच्या एकाच विभागाकडून पूर्णत्वास नेणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे यात शासनाच्या संबंधित सर्व विभागांचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा असल्याने सर्व विभागांनी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने महसूल, ग्रामविकास, नगर विकास, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महिला व बालविकास विभाग, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, साखर आयुक्तालय, कामगार विभाग, आदिवासी विकास विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग आणि सार्वजनिक आरोग्य व गृह विभाग या विभागांचा सहभाग आवश्यक आहे. त्याअनुषंगानेच शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेसाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.
या ठिकाणी राबविणार शोधमोहीम
जिल्ह्यात ५ ते २० जुलै यादरम्यान शाळाबाह्य अनियमित व स्थलांतरित बालकांच्या नोंदी घरोघरी जाऊन घेतल्या जाणार आहेत. याशिवाय बसस्थानक, रेल्वेस्थानक, सिग्नलस, हॉटेल, खानावळ, सार्वजनिक ठिकाणे, बाजार तळ, वीटभट्ट्या व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी शाळाबाह्य व अनियमित तसेच स्थलांतरित मुलांची शोधमोहीम राबविली जाणार आहे.येत्या ५ ते २० जुलै यादरम्यान शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी शोधमोहीम राबविली जाणार आहे. या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात शिक्षण विभागामार्फत नियोजन केले आहे. - बुध्दभुषण सोनवने, शिक्षणाधिकारी प्राथमिक