अमरावती : शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांना मुख्य प्रवाहात सहभागी करण्याच्या उद्देशाने ५ ते २० जुलै या काळात महापालिका क्षेत्रात शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, सिस्टिम मॅनेजर अमित डेंगरे तसेच शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी स्थानिक नेहरू मैदान येथे सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नेहरू मैदानातील पारधी समाज बांधवांचे सर्व्हेक्षण करण्यात आले.
सर्वेक्षणावेळी अनेक वंचितांनी मनपा आयुक्त तथा प्रशासक कलंत्रे यांना शिक्षणाविषयी त्यांच्या पाल्यांच्या समस्या सांगितल्या. याप्रसंगी त्यांचे शिक्षण योग्यप्रकारे होण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. महापालिकेच्या शिक्षण विभागाची टिम व महापालिका क्षेत्रातील विविध व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांचे शिक्षक हे सर्वेक्षण अभियान राबविणार आहेत. हे सर्वेक्षण वीटभट्टी परिसर, छत्री तलाव परिसर, नवसारी, धर्म काटा परिसर, गांधी आश्रम, रेल्वे स्टेशन, विविध बांधकामे, सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठा, बस स्टेशन इत्यादी ठिकाणी करण्यात येणार आहे. मनपा क्षेत्रात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याप्रसंगी समग्र शिक्षाचे कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ, शाळा निरीक्षक ज्योती बनसोड, संध्या वासनिक, क्रीडा निरीक्षक प्रवीण ठाकरे, शाळाबाह्य सर्वेक्षण समन्वयक सुषमा दुधे, धीरज सावरकर, योगेश राणे, संजय बेलसरे, निजामुद्दीन काझी, शुभांगी सुने, दीपाली थोरात तसेच सर्व विशेष शिक्षक, केंद्र समन्वयक व केंद्रातील मुख्याध्यापक उपस्थित होते.
राज्यामध्ये विविध कारणांमुळे बालके शाळाबाह्य होत असतात. या शाळाबाह्य होणाऱ्या व स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या बालकांना शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून शिक्षण अबाधित राखण्यासाठी ५ ते २० जुलै या कालावधीमध्ये सर्वेक्षण केले जात आहे. त्याबाबतची एसओपी व माहिती संकलनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.- सचिन कलंत्रे, आयुक्त, महापालिका