नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील एरंडगाव शिवारात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्याबाबत तातडीने उपाययोजना सुचिवण्याची मागणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे शेतकऱ्यांनी केली आहे.
यावर्षी दमदार पाऊस झाल्याने शिवारातील विहिरीची पाण्याची पातळी वाढली. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकाचा पेरा वाढला. एरंडगाव शिवारात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असल्याचे येथील शेतकरी अतुल कारमोरे यांनी सांगितले. तालुक्यात ४ हजार ३९९ हेक्टरमध्ये हरभरा व १२५५ हेक्टर क्षेत्रात गव्हाचा पेरा झाला आहे. अद्यापही रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरूच आहे. कपाशीवर झालेल्या बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांनी हे पीक काढून त्या क्षेत्रात हरभरा व गव्हाचा पेरा केला. ज्या शिवारात अतिपावसामुळे तुरीचे पीक जळाले, त्या क्षेत्रातही रबी हंगामाचा पेरा झाला आहे.
यंदा सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्याचा रबी हरभरा व गव्हाच्या उत्पादनाकडे कल वाढला आहे.