लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच डेंग्यूचेही संकट घोंगावत आहे. जुलै महिन्यात महापालिका क्षेत्रात १३, तर ग्रामीणमध्ये १० रुग्णांची नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात रुग्णसंख्या यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे. महानगरातील अस्वच्छतेने साथरोगांना असलेले निमंत्रण नागरिकांच्या जिवावर उठणार आहे.पावसाळ्यापूर्वी सफाईची कामे पूर्ण झाली नाहीत. कोरोनाच्या उदे्रकात फक्त सुरुवातीच्या काळात स्वच्छतेचे काम झाले. नंतर पूर्वीचीच परिस्थिती कायम राहिली. महापालिका क्षेत्रात दैनंदिन कचरा संकलनाचे कंत्राट असले तरी एकाही प्रभागात कचऱ्याची नियमित उचल होत नाही. या कंत्राटदारांवर कुणाचेच नियंत्रण नाही. महापालिकेचे प्रशासन याबाबत कुचकामी ठरले आहेत. एकही पदाधिकारी याविषयी बोलावयास तयार नाही. कंत्राटदाराशी असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे महापालिका क्षेत्रात स्वच्छतेचे पार धिंडवडे निघाले आहेत. ठिकठिकाणी साचलेल्या डबक्यांमध्ये आता डासांची उत्पत्ती होत आहे. केवळ डेंग्यूच नव्हे, तर आता मलेरियाचाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.कोरोनाकाळात आरोग्य यंत्रणा आता डेंग्यूच्या उदे्रकाची भीती निर्माण झाली आहे. महापालिका क्षेत्रात दोन वर्षांपूर्वी डेंग्यूचा प्रकोप होऊन डझनभर नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला होता. महापालिकेच्या गलथान आरोग्य व स्वच्छता यंत्रणेचे हे नागरिक बळी ठरले होते. यापासून महपालिका प्रशासनाने काही धडा घेतलेला दिसत नाही. डेंग्यूच्या उदे्रकाला आता सुरुवात झालेली आहे. वेळीच संसर्ग नियंत्रणात न आल्यास महापालिका प्रशासनाला सावरणे कठीण होणार आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ नये, डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी शुक्रवारी एकाच वेळी शहरात फवारणी, धुरळणी करण्यात आली. कमतरता आढळल्यास आरोग्य व स्वच्छता विभागांना निर्देश देण्यात येईल, असे आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.एडिस इजिप्टाय डासांपासून आजारडेंग्यू हा संसर्गजन्य आजार एडिस इजिप्टाय मादी डासाचे चावण्यामुळे होतो. हा काळा डास असून, याचे अंगावर पांढरे ठिपके असतात. हाच डास दुसऱ्या व्यक्तीला चावल्यास त्यालादेखील डेंग्यू होण्याची भीती आहे. हा डास जास्त उंच उडत नाही. एकूण दोन प्रकार असले तरी डेंग्यू-२ हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, यामध्ये शरीरातील पांढऱ्या पेशी (प्लेटलेट्स) ची संख्या झपाट्याने कमी होते. शरीराचा एखादा अवयवदेखील निकामी होतो. प्रसंगी मृत्यूदेखील ओढवतो. यातून रोगमुक्त होण्यासाठी दोन आठवड्यांपर्यंतही कालावधी लागू शकतो. लक्षणे कमी झाल्यानंतरही रुग्ण दीर्घकाळापर्यंत अशक्त राहतो.ही आहेत डेंग्यूची लक्षणेखूप ताप येणे हे डेंग्यूचे प्राथमिक लक्षण आहे. डोळ्यांच्या मागे जळजळ करणे, तापामध्ये अंगदुखी, सांधेदुखी, उलट्या होणे, मळमळणे, तीव्र स्वरूपाची डोकेदुखी, काहीही खाण्याची इच्छा न होणे, पांढऱ्या पेशींची संख्या झपाट्याने कमी होणे, पोट फुगणे, तापासोबतच अंगावर लाल रंगाचे डाग पडणे, तोंडाची चव जाणे, चक्कर येणे, पचनक्रिया खराब होऊन उलट्या होणे, कधी उलट्यांमधून रक्तस्रावही होणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, श्वासाची गती कमी होणे, हिरड्यांमधून रक्तस्राव होणे, पोटात तीव्र स्वरूपाच्या वेदना आदी लक्षणे असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.अस्वच्छता उठणार नागरिकांच्या जिवावरमहापालिका क्षेत्रात डबकी साचली आहे. कचरा, नारळाच्या वाट्या, पडलेले टायर, प्लास्टिकचे डबे यामध्ये डेंग्यूच्या अळ्या तयार होतात. कुठल्याही प्रभागात नियमित फॉगिंग नाही. प्रत्येक कंत्राटदाराजवळ पाच फॉगिंग मशीन आवश्यक असताना बहुतेकांजवळ नाही. डबके-नाल्यांमध्ये एमएलओ ऑईल टाकले जात नाही. आरोग्य निरीक्षक, ज्येष्ठ आरोग्य निरीक्षकांचे याकडे दुर्लक्ष आहे. आयुक्त व उपायुक्तांचा झोननिहाय आढावा वा भेटी नसल्याने यंत्रणांचे फावले आहे.
कोरोनात डेंग्यूचाही उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 5:00 AM
पावसाळ्यापूर्वी सफाईची कामे पूर्ण झाली नाहीत. कोरोनाच्या उदे्रकात फक्त सुरुवातीच्या काळात स्वच्छतेचे काम झाले. नंतर पूर्वीचीच परिस्थिती कायम राहिली. महापालिका क्षेत्रात दैनंदिन कचरा संकलनाचे कंत्राट असले तरी एकाही प्रभागात कचऱ्याची नियमित उचल होत नाही. या कंत्राटदारांवर कुणाचेच नियंत्रण नाही. महापालिकेचे प्रशासन याबाबत कुचकामी ठरले आहेत. एकही पदाधिकारी याविषयी बोलावयास तयार नाही.
ठळक मुद्दे२३ रुग्णांची नोंद : महानगरात स्वच्छता कोमात, साथरोगांना निमंत्रण