लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : तालुक्यातील ४० हून अधिक गावे पंधरवड्यापासून डेंगूसदृश तापाने फणफणली आहेत. खासगी दवाखाने हाऊसफुल्ल आहे. ग्रामपंचायतींकडे कोणताही निधी नसल्याने फवारणी करायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना आता ग्रामीण भागात दोन ते १७ वर्षे वयोगटातील मुलांना डेंग्यूसदृश तापाची अधिक लागण झाली आहे. तापाचे कमी-अधिक प्रमाण, कातडीवर रक्ताळलेले पुरळ,, रक्तस्राव, झोप जास्त येणे, भ्रम, दम लागणे, सतत उलट्या, पोटदुखी, सूज, शरीर थंड पडणे, रक्तदाब कमी होणे अशी डेंग्यूची लक्षणे मुलांमध्ये आढळत आहेत. शहरासह ग्रामीण भागातील रुग्ण खासगी रुग्णालयात अधिक येत असल्याने ही दवाखाने फुल्ल झाली आहेत.
ग्रामपंचायतींनी निधी आणायचा कोठून?तालुक्यातील डेंग्यूसदृश तापाचे प्रकोप वाढत असताना ग्रामपंचायतकडे फवारणीसाठी निधी नाही. पंधराव्या वित्त आयोगाचे अनेक गावांचे कृती आराखडे तयार असले तरी ग्रामसेवकांची डिजिटल स्वाक्षरी तयार व्हायची असल्याने हा निधी खर्च करता येत नाही. कोरोनाकाळातील दोन वर्षांमध्ये पाणी व घर पट्टी वसुली झालेली नाही. गावात आरोग्य सुविधेवर फवारणी करण्यासाठी निधी नाही. त्यामुळे डेंगूसदृश तापावर उपाययोजना करायच्या कशा, असा प्रश्न ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे.
चौदाव्या वित्त आयोगाचे व्याजाचे पैसे अनेक ग्रामपंचायतींच्या खात्यात पडले आहेत. ही रक्कम काही दिवसांत जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येईल. त्यापेक्षा सदर रक्कम फवारणीकरीता वापरण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यास ग्रामीण भागात अनेक उपाययोजना या साथीच्या आजारावर करता येऊ शकतील. - सतीश हजारे, सरपंच, मंगरूळ दस्तगीर