लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना ब्लास्टमध्ये कोरोनासारखीच लक्षणे असणाऱ्या ‘सारी’ (सिव्हिअर ॲक्यूट रेस्पीरेटरी इलनेस) या आजाराचेही रोज सरासरी ६ ते ७ रुग्णांची नोंद होत आहे. यंदा जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये ३८८ रुग्णांची नोंद व तिघांचा मृत्यू झालेला आहे. वर्षभरात २६०० रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये २५५ रुग्णांचे बळी गेल्याने कोरोना संसर्ग काळात जिल्ह्याची चिंता वाढली आहे.सर्दी, ताप, खोकला, श्वसनास त्रास आदी कोरोनासदृश लक्षणे असल्याने सुरुवातीच्या काळात ते अगदी ऑक्टोबरपर्यंत या आजाराकडे आरोग्य यंत्रणेद्वारा लक्ष देण्यात आले व त्यानंतर मात्र, फारसे गांभीर्याने घेण्यात आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता तर खासगी रुग्णालयात सारीच्या रुग्णाला कोरोनाचा रुग्ण समजून उपचार केले जात असल्याची उदाहरणे आहेत. या आजारासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाच्या विशेष सूचना असतानाही दुर्लक्षित केले जात आहे. सध्या पीडीएमसी व जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘सारी’च्या आजारासंदर्भात विशेष कक्ष आहे. ग्रामीणमध्ये मात्र ओपीडीमध्येच उपचार केले जात आहेत. यंदा जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढता असताना ३८८ रुग्णांची नोंद झाली व विशेष म्हणजे या रुग्णांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १४४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची नोंद झालेली आहे. वर्षभरात तर ६००पेक्षा अधिक ‘सारी’चे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत.जिल्ह्यात जानेवारीच्या सुरुवातीपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या कालावधीत १५ हजारांवर कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. त्यामध्ये ‘सारी’चा शिरकाव धोकादायक मानला जात आहे.
उपचारासाठी रुग्ण लवकर आल्यास ‘सारी’ हा निश्चित बरा होणारा आजार आहे. अलिकडे या आजाराच्या रुग्णसंख्येत घट झालेली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात या आजारासाठी स्वतंत्र कक्षाची सुविधा आहे. डॉ. श्यामसुंदर निकम जिल्हा शल्य चिकीत्सक
‘सारी’च्या रुग्णांवर कोरोनाचे उपचार नकोतकोरोनासारखीच लक्षणेच असल्यामुळे ‘सारी’चे काही रुग्णांना कोरोनाचा रुग्ण समजून त्यांच्यावर उपचार केले गेल्याची उदाहरणे आहेत. यासाठी ‘एचआरसीटी’स्कॅनचा आधार घेतला गेला. मात्र, कोरोनाचा रुग्ण आरटीपीसीआर चाचणीद्वारेच निष्पन्न होत असताना चाचणीची वाट न पाहता, अशा रुग्णांवर उपचार झालेले आहेत. ‘सारी’च्या रुग्णांना ‘रेमेडेसिवर’ इंजेक्शन देऊ नये, असे डीएचओ डॉ. दिलीप रणमले यांनी सांगितले.
३७.११% ‘सारी’चे रुग्ण कोरोना पॉझिटिव्हजिल्ह्यात जानेवारी ते फेब्रुवारी या दोन महिन्यात ‘सारी’च्या ३८८ रुग्णांची नोंद झाली. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आलेली असताना १४४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची नोंद करण्यात आलेली आहे. हे प्रमाण ३७.११ टक्के आहे. एप्रिल ते डिसेंबर या काळात ४३५ रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये २६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोग्य यंत्रणेचा अहवाल आहे.