अमरावती, दि. 6 - महापारेषणद्वारा जुन्या विद्युत वाहिनीवर नव्याने वाढीव उपकेंद्र देण्यात आले. त्यांची क्षमतावाढ करण्यात आली. त्यामुळे विद्युत लाईन कमकुवत झाल्या. मात्र त्या बदलविण्यात आलेल्या नाहीत. जुन्या लघु व उच्चदाबाच्या वाहिन्यांमुळे कर्मचारी, ग्राहक आणि मुक्या प्राण्यांचे अपघात होऊन नाहक जीव गेले आहेत. ग्राहकांसह कर्मचा-यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपनी केव्हा पाऊल उचलणार, अशी विचारणा होत आहे. वीज मंडळाचे विभाजन झाल्यावर ईन्फ्रा-1 व ईन्फ्रा-2 तयार करण्यात आले. यामध्ये नव्याने अनेक उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली.जुने वीज निर्मिती संच बदलवून नवीन मोठ्या क्षमतेचे संच बसविण्यात आले. उपकेंद्रांची क्षमतावाढ करण्यात आली. नवीन ब्रेकर बसविले. जुन्या लघु व उच्चदाब वाहिन्या तशाच राहिल्या. ज्यावेळी एखादी लाईन तुटते, त्यावेळी तेवढाच भाग बदलविला जातो किंवा विद्युत पोल वाकल्यास तेवढाच पोल उभा केला जातो. आजही असेच सुरू आहे. हे पोल, स्ट्रक्चर व लाईनमुळे कर्मचारी, ग्राहक व मुक्या प्राण्यांचा जीव धोक्यात आहे. वीज कर्मचारी लाईनची देखभाल दुरूस्ती, वीजबिल वसुली आदी कामे करीत असताना एखाद्या कर्मचा-याला अपघात झाल्यास त्या कर्मचाºयासोबत असलेल्या अन्य कर्मचाºयाला शिक्षा केली जाते. हा अजब फंडा वीज कंपनीत अलीकडेच रूढ झाला आहे. ग्राहकाला अपघात झाल्यास जमावाला शांत करण्यासाठी व दोष निवारण्यासाठी कर्मचा-यालाच शासन केले जाते. मात्र, या घटना होऊच नयेत, यासाठी कंपनीकडे तूर्तास धोरणात्मक नियोजन नाही.जुनी कामे किचकट म्हणून कंत्राटदार या कामांना हात न लावता फक्त नवीन कामांनाच प्राधान्य देतात. यासाठी तांत्रिक कामगार संघटनेद्वारे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सुरक्षा साधने व सुरक्षा उपाय याला प्राधान्य द्या आदी मागण्या कंपनीकडे करण्यात आल्या आहेत. असे झाले कर्मचा-यांचे अपघात सातारा विभागात १० व १४ आॅगस्टला वीज कर्मचा-यांचे अपघात झाले आहेत. जुने स्ट्रक्चर कमकुवत झाल्याने कोणतीही चुकी नसताना कर्मचारी ज्ञानेश्वर गायकवाड यांचा मृत्यू झाला. आदमवाढ हा कर्मचारी अश्याच प्रकारच्या अपघातामुळे पुण्याच्या रूबी हॉस्पिटलमध्ये भरती आहे. लोणावळा येथे जुने स्ट्रक्चर तुटून झालेल्या अपघातात उमेश मोरे या कर्मचा-याचा मृत्यू झाला.अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात झुकलेल्या वीज वाहिनीचा स्पर्श झाल्याने शेतकरी अपंग झाला. बेनोडा येथे शॉक लागल्याने याच आठवड्यात दोन गार्इंचा मृत्यू झाला. सुरक्षा साधने व सुरक्षा उपाय याला प्राधान्य द्यावे, यासह अन्य मागण्यांसदर्भात कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला. मात्र दुर्लक्ष असल्याने ८ सप्टेंबरपासून महावितरणच्या सर्व मंडळ कार्यालयासमोर धरणे देण्यात येईल.- आर. टी. देवकांत,राज्य सरचिटणीस,तांत्रिक कामगार युनियन.
जुन्या विद्युत लाइन नादुरूस्त, नव्यांची कामे; पारेषणद्वारा उपकेंद्रांची संख्यावाढ, वाहिन्या मात्र जुन्याच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 4:41 PM