अमरावती : सार्वजनिक आरोग्याच्या मुद्यावर महापालिकेने केलेल्या दुर्लक्षितपणामुळे हाताबाहेर गेलेला डेंग्यू आता लाख प्रयत्न करूनही आटोक्यात येत नसल्याचे चित्र अमरावती महानगरीत आहे. शहरातील दवाखान्यांचा आणि रुग्णालयांचा आढावा घेतल्यावर डेंग्यू नियंत्रणाबाहेर गेल्याचे लख्खपणे जाणवते.आश्चर्य बघा, करदात्या नागरिकांना सुविधा पुरविण्याऐवजी त्यांचे बळी घेणारी व्यवस्था निर्माण होऊ देणाऱ्या कुठल्याही अधिकाऱ्यांवर अद्याप महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी ना निलंबनाची कारवाई केली, ना कुणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. आयुक्तांच्या लेखी महापालिकेच्या करदात्याच्या जीवाचे मोल किती, हे यातून स्पष्ट व्हावे.अवघ्या अमरावती शहरालाच डेंग्यूने कवेत घेतले. महापालिकेने दुर्लक्ष केलेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत 'एडिस इजिप्ती' या प्रजातीच्या डेंग्यूच्या डासांचा फैलाव इतक्या वेगाने झाला की, आता त्यांना मारायला निघालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना जणू ते वाकुल्या दाखवू लागले असावे, स्थिती इतकी प्रभावशून्य झाली आहे.अमरावती शहरातील महत्त्वाचे दवाखाने आणि रुग्णालयांमधील स्थिती जवळून न्याहाळली असता ती भयंकर असल्याचे जाणवले. खासगी दवाखाने आणि रुग्णालयांचे बाह्य रुग्ण विभाग ओसंडून वाहत आहेत. नेहमीच उत्तम प्रॅक्टिस चालणाºया डॉक्टरांकडे शंभर ते दीडशे रुग्ण बाह्य रुग्ण विभागात येत आहेत. त्यापैकी अर्धे रुग्ण तापाचे आहेत. शंभर रुग्णांपैकी १० ते १३ रुग्ण डेंग्यूचे आहेत. दवाखान्यात अचानक झालेल्या या रुग्णांच्या गर्दीमुळे डॉक्टरांचीही दमछाक होऊ लागली आहे. ज्यांच्याकडे बाह्य रुग्ण विभाग आणि रुग्णालय आहे अशा डॉक्टरांना 'गोड झोप घेण्या'ची स्वप्ने दिसू लागली आहेत, इतके त्यांचे ओव्हरएक्झर्शन वाढले आहे. सायंकाळ होऊनही बाह्यरुग्ण विभागातील रांग कायम असल्याचे बघून रुग्णांना इतर रुग्णालयात तपासणीला जा, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. रुग्णालयातील बेड फुल्ल आहेत. वैद्यकीय शास्त्रात डॉक्टरांच्या निगराणीची गरज सांगण्यात आली असली तरी जागेअभावी रुग्णांना औषधींचे प्रिस्क़्रिप्शन देऊन घरी पाठविले जात आहे.
डेंग्यू नियंत्रणाबाहेर दवाखाने ‘ओव्हरफ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 1:15 AM
सार्वजनिक आरोग्याच्या मुद्यावर महापालिकेने केलेल्या दुर्लक्षितपणामुळे हाताबाहेर गेलेला डेंग्यू आता लाख प्रयत्न करूनही आटोक्यात येत नसल्याचे चित्र अमरावती महानगरीत आहे. शहरातील दवाखान्यांचा आणि रुग्णालयांचा आढावा घेतल्यावर डेंग्यू नियंत्रणाबाहेर गेल्याचे लख्खपणे जाणवते.
ठळक मुद्देओपीडीत वाढली गर्दी, डॉक्टरांची दमछाक