यंत्रणेला आली जाग : महसूल, पोलीस, प्रादेशिक परिवहन विभागाचा दंडअमरावती : राष्ट्रीय महामार्गवर वहन परिमाणापेक्षा अधिक रेतीची वाहतूक करणाऱ्या सहा ट्रकांवर पोलीस विभागाच्या जिल्हा ग्रामीण वाहतूक शाखेद्वारा शुक्रवारी सकाळी कारवाई करण्यात आली. सर्व ट्रक तिवसा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे. याच ट्रकवर तिवसा तहसीलदार व प्रादेशिक परिवहन विभाग कारवाई करणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर रेतीची ‘ओव्हरलोड’ वाहतूक करुन वाळूमाफिया धुमाकूळ घालत आहेत. या चोरीच्या रेतीचा वापर शासकीय कामात होत असून शासनाच्या लाखोच्या महसुलास चुना लागत असल्याचे वृत्त गुरुवारच्या अंकात प्रकाशित करण्यात आले होते. अखेर महसूल, पोलीस व आरटीओ विभागाला जाग आली. शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गवर तिवसा नजीक ट्रक क्र. एमएच/३२ क्यू ३५५६ (परवान्यापेक्षा ४ ब्रास जास्त), एमएच२९-टी०६५४ (परवान्यपेक्षा ३.५० ब्रास जास्त), एमएच२७-एक्स-८२० (परवान्यापेक्षा १ ब्रास जास्त), एमटीजी ४९३७ (परवान्यापेक्षा ०.७५ ब्रास जास्त), एमएच४०-वाय४६८३ (परवान्यापेक्षा २ ब्रास जास्त) या ट्रकवर कारवाई करण्यात येऊन ट्रक तिवसा ठाण्यात जमा करण्यात आले आहे. तिवसा तहसील कार्यालयाद्वारा सहाही ट्रकचा पंचनामा करण्यात आला आहे. या ट्रकवर महसूल विभाग व प्रादेशिक परिवहन विभाग दंडात्मक कारवाई करणार आहे.बाजारभावापेक्षा प्रती ब्रास तीन पट दंडवहन परिमाणापेक्षा अधिकची रेती आढळल्यास महसूल विभागाद्वारा वहन परिमाणाची रॉयल्टी व जितकी ब्रास रेती जास्त आहे त्यासाठी त्या ब्रासचा बाजारभावाच्या तीनपट दंडाची आकारणी करण्यात येते. या सहा ट्रकवरील कारवाईमुळे लाखांवर शासन महसूल जमा होणार आहे.
रेतीची ‘ओव्हरलोड’ वाहतूक, सहा ट्रकांवर कारवाई
By admin | Published: April 18, 2015 12:06 AM