बडनेरा/ अमरावती: एक्सप्रेस हायवेवरील कोंडेश्वर टी पॉइंट जवळ भीषण अपघातातअमरावतीच्या युवक युवतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भरधाव कार कट मारून एका ट्रकला ओव्हरटेक करताना ती कार रस्त्यावर उभ्या ट्रकला धडकली. १९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास हा प्राणांतिक अपघात घडला. गौरी यशवंत शेळके (१७) व आदित्य अखिलेन्द्र विश्वकर्मा (१९, दोघेही राहणार: शिवाजीनगर, सूतगिरणी रोड, अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर इर्विन रूग्णालयात मृतांचे नातेवाईक एकमेकांना भिडले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता.
आदित्य व गौरी हे एमएच ३४ बीआर १४९५ या क्रमांकाच्या कारने हायवेने जात असताना ती कार उभ्या ट्रकला भिडली. त्यावेळी आदित्य कार चालवत होता. प्रत्यक्षदर्शीनुसार, आदित्य हा स्टेरिंगमध्ये फसला होता. तर, गौरी लगतच्या सीटवर बसली होती. तिच्या डोक्याला जबर मार लागला होता. घटनास्थळी धावून गेलेल्या नागरिकांनी पोलीस तसेच ॲम्बुलन्सला बोलावले. मात्र त्या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर, ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. धडक एवढी जबर होती की कारचा चेंदामेंदा झाला.
गौरी ही अमरावतीच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिकत होती. सोमवारी सकाळी सात वाजता तिच्या वडिलांनीच तिला कॉलेजमध्ये सोडून दिले होते. तर, आदित्य हा नरसम्मा कॉलेजमधील १२ वीचा विद्यार्थी होता. दोघे शेजारी असल्याने त्यांच्यात ओळख होती. ती घट्ट करण्याच्या प्रयत्नात तो असल्याने त्याच्या व आपल्या कुटुंबात वाद देखील झाले होते, असे गौरीच्या वडिलांनी सांगितले. याप्रकरणी आदित्यविरूध्द गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मुलीचे शवविच्छेदन करू देणार नाही, असा पवित्रा गौरीच्या कुटुंबांनी घेतला होता. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी मृत आदित्यविरूध्द गुन्हा दाखल केला.
कोतवाली पोलिसांत एनसी दाखल
मृत मुलीच्या नातेवाईकांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप मृत मुलाच्या चुलतभावाने केला. त्यांनी कोतवाली पोलिसांत धाव घेतली. मृताच्या चुलतभावाच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी मुलीच्या काही नातेवाईकांविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला. शिवाजीनगरला कुठलाही राडा होऊ नये, म्हणून शहर कोतवाली पोलिसांनी मृत आदित्यच्या आईवडिलांसह अन्य नातेवाईकांना संरक्षण देऊन ठाणे परिसरातच राहण्याची सुचना केली.
इर्विनच्या अपघात कक्षात, बाहेर राडा
गाैरीला आदित्यने कॉलेजमधून पळवून नेले. त्याने तिला पळविलेच नसते, तर अपघात झाला नसता, त्यामुळे आमच्या मुलीच्या मृत्यूला तोच कारणीभूत असल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केला. तर, आदित्यच्या नातेवाईकांनी मुलीला दोषी ठरविले. यावरून मृत आदित्य व गौरीच्या कुटुंब व नातेवाईकांमध्ये चांगलाच राडा झाला. जमावातील अनेकांंनी इर्विनच्या अपघात कक्षात, बाहेर परस्परांना मारहाण केली. शिव्यांची लाखोली वाहिली. काहींनी आदित्यच्या मृतदेहाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. शवविच्छेदन गृहासमोर देखील मृतांच्या नातेवाईकांमध्ये झटापट झाली.
गौरीच्या वडिलांची पोलिसात तक्रार
आमच्याच भागात राहणाऱ्या आदित्यने गौरीला फुस लावून पळवून नेले. तो तिच्याशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. या प्रकारावरून पुर्वी वाद देखील झाले होते. त्याने भरधाव कार चालविल्यानेच त्या दोघांचा मृत्यू झाला. आपल्या मुलीच्या मृत्यूला तोच कारणीभूत असल्याचे गौरीचे वडील यशवंत कृष्णराव शेळके यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अपहरण, अपघात व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर गौरीच्या शवविच्छेदनास तिच्या कुटुंबियांनी होकार दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"