अमरावती : सध्या जिल्ह्यातील दोन जम्बो तसेच सहा लहान ऑक्सिजन प्लांट निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे आठही प्लांट दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मार्च महिन्यात कोरोना संसर्ग वाढत असताना राज्यभरात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे हाहाकार माजला होता. रुग्णालयातील ऑक्सिजनचा तुटवडा बघून रुग्णांची चिंता वाढली होती. मात्र, अमरावतीत ऑक्सिजनबाबत कोणतीही गंभीर समस्या निर्माण झाली नाही. परंतु, मार्च महिन्यात कोरोनाच्या लाटेत राज्यभरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला झाल्याची बाब लक्षात घेता राज्य शासनाने जिल्ह्यात सहा नवे ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मंजुरी दिली. यासाठी दोन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. एक महिना उलटल्यानंतर सर्व आठही प्लांटचे साधारपणे ६० टक्के काम शिल्लक असून, उर्वरित काम एका महिन्यात पूर्ण करावयाचे आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विन व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उभारला जात असलेल्या ऑक्सिजन प्लांटमध्ये २५० सिलिंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. अचलपूर, धारणी, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, दर्यापूर आणि वरूड येथे उभारले जात असलेल्या प्लांटवर प्रत्येक दिवसाला ४४ सिलिंडरची निर्मिती होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात दररोज ५१६ ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होणार आहे. यासाठी युध्दपातळीवर काम सुरू आहे. सध्या रायपूर व नागपूर येथून ऑक्सिजनचा जिल्ह्याला पुरवठा होत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती झाल्यास त्रास कमी होऊन रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
बॉक्स
५.८५ कोटींहून अधिक खर्च
जिल्ह्यातील आठही प्लांटच्या निर्मितीसाठी ५ कोटी ८५ लाख ६८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या ठिकाणी सरळ हवेतून ऑक्सिजनची निर्मिती होईल. तसेच पाईपव्दारे हे शुद्ध ऑक्सिजन रुग्णांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. सदर प्लांट सुरू झाल्यानंतर जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होणार असल्याचे मत जिल्हा प्रशासनाने व्यक्त केले.