लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात गुरुवारी सकाळी प्रचंड प्रमाणात गारपीट झाली. पावसाने शेतातील कापूस ओलाचिंब झाला असून तो आता निकामी झाला आहे. त्याचसोबत तूर या पिकालाही जोरदार फटका बसला आहे.
गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शासकीय खरेदी केंद्रांवर उघड्यावर ठेवलेल्या धानाच्या पोत्यात पाणी शिरले व धान भिजून त्याला अंकुर फुटल्याचे दिसत आहे. हे धान घेण्यास केंद्राने नकार दिल्याने शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी महामंडळातर्फे धान खरेदी केंद्र सुरू आहेत. परंतु, अवकाळी पावसाचा सामना करण्यास या केंद्रावर कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. अनेक दिवसांपासून केंद्रावर उघड्यावर धान ठेवण्यात आले आहे. नियोजन नसल्याने अनेक दिवस धानाची मोजणी होत नाही. त्यामुळे धान भिजत आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत आलेल्या पावसाने पोत्यातून जमिनीवर सांडलेले धान अंकुरले आहेत. मोठ्या कष्टाने पिकविलेल्या धानाची होत असलेली नासाडी पाहून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.
सध्या खुल्या बाजारात बारीक धानाला दोन हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. तर शासकीय धान केंद्रावर बोनससह रुपये भाव जाहीर झाल्याने शासकीय केंद्रावर ठोकळ धानासह बारीक धानाची आवक वाढली आहे. अशातच धान्य ठेवण्यासाठी योग्य व समतल जागा मिळत नसल्याने मिळेल त्या जागेवर पोती ठेवली जात आहेत. कधी बारदाना संपल्याने तर कधी नैसर्गिक कारणांमुळे केंद्र बंद राहून धान खरेदीला विलंब होत आहे. १५ दिवसांपासून धान खरेदीविना उघड्यावर पडून आहेत. पोती झाकण्यासाठी साधी ताडपत्री दिली जात नाही. त्यामुळे प्रचंड दैना सुरू आहे.मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाची संततधार बुधवारी सकाळीसुद्धा कायम होती. या पावसामुळे धान खरेदी केंद्रांवर उघड्यावर ठेवलेले धान पाण्यात भिजून धान अंकुरले आहेत. आता ओले व अंकुरलेले धान खरेदी करण्यास केंद्रावर मनाई केली जात असल्याने डोकेदुखी वाढली आहे. खरेदी केंद्रावरील धान तात्काळ खरेदी करून न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.