अमरावती : आपली कामाप्रति असणारी निष्ठा, प्रामाणिकपणा यामुळेच यंदा जीएसटी विभागाचे देशाच्या विकासात मोलाचे योगदान आहे. तिसरी महाशक्ती होण्यासाठी देशाला तुमची गरज असल्याचे आवाहन शंकरबाबा पापळकर यांनी रविवारी केले. आपल्या शायराना अंदाजात ते म्हणाले, ‘आग तो लग गयी, घरमें बचाही क्या, बच गया मैं, तो जलाही क्या हैं’.
विभागातील जीएसटी विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. अनाथांचे नाथ व १२३ अनाथ, गतिमंद मुलांचे पिता शंकरबाबा पापळकर यांच्याद्वारा या मुलांचा आधारवड बनून आयुष्यभर त्यांची सेवा करत आहे. त्यांच्या या समर्पित व त्यागी जीवनकार्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग अमरावतीतर्फे त्यांचा सत्कार अमरावती विद्यापीठातील के. जी. देशमुख सभागृहात ११ फेब्रुवारी पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे अपर राज्यकर आयुक्त अनंता राख, राज्यकर सहआयुक्त संजय पोखरकर व त्यांच्या सुविद्य पत्नी, महापालिका आयुक्त देविदास पवार, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख, यवतमाळ राज्य कर उपायुक्त एकनाथ पावडे, अकोला धनंजय पाटील, राज्य कर उपायुक्त (अपिलीय) सोपान सोळंके यांच्यासह विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
गांधारीच्या गायनाने भारावले उपस्थितशंकरबाबांच्या विषयी बोलताना राज्य कर सहआयुक्त संजय पोखरकर भावुक झाले होते. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नीद्वारे शंकरबाबांची कन्या गांधारी हिला भेट देण्यात आली. गांधारीने सुरेख आवाजात ‘ये मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तीपर गीत म्हणायला सुरुवात करताच शंकरबाबांसह उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी गाण्याला टाळ्यांनी साथ दिली व टाळ्यांच्या कडकडाटात तिचे स्वागत अन् कौतुक केले.
कृतज्ञता निधी शंकरबाबांना समर्पितयाप्रसंगी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यात आंशिक योगदान म्हणून स्वयंस्फूर्तीने कृतज्ञता निधी गोळा करून विभागाचे प्रमुख राज्य कर सहआयुक्त संजय पोखरकर यांच्या हस्ते शंकरबाबा यांना समर्पित केला. भारत सरकारने त्यांना नुकतेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. वस्तू व सेवा कर विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा ९ व १० फेब्रुवारीला हव्याप्र मंडळावर पार पडल्या. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेता खेळाडूंना शंकरबाबांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.