वरूड : तालुक्यातील फत्तेपूर येथील शेतकरी लक्ष्मण खरबडे यांच्या गावाजवळील शेतामध्ये गोठ्यात बैल बांधलेले असायचे. बुधवारीसुद्धा बैलजोडी शेतातच बांधली होती. सदर शेतकरी दुसऱ्या दिवशी शेतात गेले असता दोन्ही बैल खाली मान टाकून त्यांचे तोडातून फेस गाळत होते. यावेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून उपचार केले; परंतु प्रयत्नाला यश आले नाही. दोन्ही बैल २७ मे, गुरवारी मृत्यू पावले. मानवालाही लाजवेल अशी घटना घडल्याने विकृतीचा प्रकार असून सूड घेतल्याची चर्चा होती.
तालुक्यातील फत्तेपूर येथील शेतकरी लक्ष्मण खरबडे यांचे शेत असून शेतात बैलांचा गोठा आहे. शेतकऱ्यांच्या मालकीची बैलजोडी शेतात बांधली होती. गुरुवार, २७ ला शेतकरी शेतात गेले आता दोन्ही बैलांच्या तोंडातून फेस येताना दिसला. यामुळे घाबरलेल्या अवस्थेत सदर शेतकऱ्याने पशू चिकित्सकाला पाचारण केले. तेव्हा उपचार करण्यात आले. मात्र, प्रयत्नाला यश मिळाले नाही. अखेर दोन्ही बैलांचा गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यात मृत्यू झाला. दोन्ही बैलांचे शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये विष दिल्याने मृत्यू झाल्याचे उघड झाले. यामध्ये शेतकऱ्याचे एक लाखाचे नुकसान झाले असून कुण्या तरी अज्ञात विकृत इसमाने दोन्ही बैलांना विष देऊन ठार केल्याचा संशय शेतकऱ्याला असल्याने याबाबत वरूड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप चौगावकर यांचे मार्गदर्शनात एएसआय गजानन गिरीसह वरूड पोलीस करीत आहे.