लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला पाकिस्तानी कैदी आहे. या पार्श्वभूमीवर कारागृहाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. मोहम्मद जावेद असे या पाकिस्तानी नागरिक असलेल्या कैद्याचे नाव आहे. भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांत निर्माण झालेल्या दुराव्यामुळे या पाकिस्तानी कैद्याला अंडा बराकीत सुरक्षित ठेवण्यात आले आहे.राज्याच्या गृह विभागाने कारागृह प्रशासनाला सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात ज्या कारागृहांमध्ये पाकिस्तानी नागरिक हे विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहेत, त्यांच्यावर कारागृहांच्या आत जीवघेणे हल्ले होण्याची दाट शक्यता बळावली आहे. त्यामुळे नागपूर, मुंबईच्या आर्थर रोड, येरवडा, औरंगाबाद, ठाणे आणि अमरावती मध्यवर्ती कारागृहात जेरबंद असलेल्या पाकिस्तानी कैद्यांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.कारागृहाच्या आत आणि बाहेरील सुरक्षेविषयी पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेण्याचे कळविले आहे. राज्याच्या कारागृहात बॉम्बस्फोट, स्फोटक पदार्थ बाळगणे, अद्ययावत शस्त्रसाठा आढळणे, गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणे, रेल्वे गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट अशा विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली पाकिस्तानी नागरिक कैदी म्हणून जेरबंद आहेत. मध्यवर्ती कारागृहात पाकिस्तानी कैदी असल्याने सुरक्षा यंत्रणेत वाढ केली आहे. काही महिन्यांपूर्वी या पाकिस्तानी कैद्याला सामान्य बराकीत ठेवण्यात आले होते. मात्र, काश्मिरात पुलवामा येथे अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या ४० जवानांना ठार केल्यानंतर कारागृहात असलेल्या पाकिस्तानी कैद्याला अंडा बराकीत कडोकोट बंदोबस्तात ठेवले गेले. तो कारागृहात जन्मठेपेची शिक्षा सन २०१६ पासून भोगत आहे.कारागृहात प्रसिद्ध खून खटला, मोक्का, नक्षलवाद अशा विविध गुन्ह्यांतील आरोपी जेरबंद आहेत. मात्र, पाकिस्तानी कैदी मोहम्मद जावेद याला अलीकडे कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आले आहे. अंडा बराकीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आहे. या सीसीेटीव्हीचे थेट कनेक्शन कारागृह अधीक्षकांच्या दालनात जोडण्यात आले आहे.तटाला पोलीस सुरक्षेचा वेढाकारागृहात विविध गुन्ह्यांच्या आरोपाखाली कैदी शिक्षा भोगत आहेत. मात्र, पाकिस्तानी कैदी जेरबंद असल्यामुळे कारागृह प्रशासनाने बाह्य सुरक्षेसाठी पोलीस विभागाला पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार फ्रेजरपुरा पोलिसांनी कारागृहाच्या बाहेरील सुरक्षेच्या अनुषंगाने तटाला सुरक्षेचा वेढा दिला आहे. पोलिसांचे फिरते पथक, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट आदी सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे चित्र आहे.मोहम्मद जावेद रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपीमुंबई रेल्वे स्थानकावर सन १९९७ मध्ये गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले होते. या घटनेतील मोहम्मद जावेद हा एक आरोपी आहे. त्याला बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेप सुनावण्यात आली. आरोपी जावेद याला अगोदर मुंबई येथून नागपूर कारागृहात ठेवण्यात आले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पुन्हा अमरावती कारागृहात सन २०१६ पासून शिक्षा भोगत असल्याचे सूत्रांनी सांगितले.