सध्या उन्हाच्या तीव्र झळा लागत असल्याने पाण्याची पातळी कमालीपेक्षा खाली गेली. यंदा अत्यल्प पाऊस झाला. पाण्याची आवक नसल्याने विहिरीतील पाणीसाठा अल्पावधीतच संपण्याच्या मार्गावर आहेत. अमरावतीला अप्पर वर्धा धरणाचा आधार असला तरी बहुतांश ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. कायम दुष्काळाच्या छायेत असलेल्या नांंदगाव तालुक्यातील चांदी प्रकल्पाचा जलसाठा १४ टक्क्यांवर आला आहे, तर वरूड तालुक्यात पाण्याअभावी संत्राझाडे तोडण्याचा निर्णय शेतकरी घेत आहेत. येत्या काही दिवसांत ही स्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.नरेंद्र जावरे।आॅनलाईन लोकमतचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील १० गावांत पाणीटंचाई असून, त्या गावांमध्ये आता टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.उन्हाचा पारा चढू लागताच मेळघाटातील आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. तालुक्यातील पस्तलई आणि तोरणवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविल आहे. या दोन्ही गावांची सद्यस्थिती पाहून लवकरच टँकरने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी सांगितले. तालुक्यातील १० गावांमध्ये जानेवारी ते मार्च या महिन्यात टँकर लागण्याची अपेक्षा होती; मात्र एप्रिल ते जून या महिन्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल. भांदरी, मोथाखेडा, तारूबांदा, भीलखेडा, पाचडोंगरी, खटकाली, आडनदी, मनभंग येथे टँकरने पाणीपुरवठा होईल.हातपंप निकामी, पथक अचलपुरातविस्तारामुळे आदिवासींना तालुका मुख्यालय येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तालुक्यात एकूण ५५ ग्रामपंचायतींमध्ये जवळपास १६० गावे आहेत. त्यांच्यासाठी ८५ नळयोजना व १६८ हातपंप आहेत. ३७ वीजपंप, ४९ सार्वजनिक विहिरी, ३८ खाजगी विहिरी असून, संभाव्य पाणीटंचाई पाहता, १५ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. अनेक ग्रामपंचायतींच्या बेपर्वाईमुळे पाणीपुरवठा योजनासुद्धा निकामी पडल्याचे चित्र आहे. चिखलदरा तालुक्यासाठी स्वतंत्र हातपंप दुरुस्ती पथक असले तरी त्याचे मुख्यालय अचलपूर पंचायत समिती असल्यामुळे वेळेवर हातपंप दुरुस्त होत नसल्याच्या तक्रारी आहेत. चिखलदरा तालुक्यासाठी तीन स्वतंत्र हातपंप पथक देण्याची मागणी करण्यात आली आहे.‘सिडको’च्या विकासकामांना फटका... विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. शासनाने कोट्यवधी रुपयांच्या योजना येथे जाहीर केल्या असल्या तरी पाण्यासाठी चिखलदरावासीयांची मागील दहा वर्षांपासून वणवण सुरू आहे. साडेपाचशे कोटी रुपये खर्चून सिडकोचा प्रकल्प येथे राबवण्यास सुरुवात झाली असली तरी पाण्याअभावी अनेक विकासकामे खोळंबली आहेत. राज्य आणि राज्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या उन्हाळ्यात मंदावल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील व्यापारावरसुद्धा परिणाम झाला आहे.
पाणीटंचाईच्या लागल्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 10:50 PM
विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील १० गावांत पाणीटंचाई असून, त्या गावांमध्ये आता टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.
ठळक मुद्देउपाययोजनांवर भर : अमरावती शहरासह जिल्हाभरात ठरावीक दिवशीच पाणीपुरवठा, ग्रामस्थांची पायपीट