अमरावती : बिच्छू टेकडी हा अनेकांसाठी दुर्लक्षित करण्यात आलेला भाग त्यातही वीट भट्टीचा परिसर. या भागात राहणाऱ्या रंग कामगाराच्या मुलीने यशाचे शिखर गाठले आहे. तिने यूपीएससीचा अवघड प्रवास यशस्वी केला आहे. तिच्या यशामुळे गुणवत्ता ही परिश्रमाच्या बळावरच मिळवता येते हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पल्लवी देविदास चिंचखेडे असे या गुणवंत युवतीचे नाव. केंद्रीय लोकसेवा आयोगाने १० ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केलेल्या नागरी सेवा परीक्षा २०२१ मधील गुणवत्तेच्या आधारावर राखीव ठेवलेल्या उमेदवारांच्या यादीत तिची निवड झाली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी सेवा २०२१ चा निकाल हा ३० मे २०२२ रोजी प्रसिद्ध झाला होता. मात्र काही जागा गुणवत्तेच्या आधारे राखीव ठेवण्यात आल्या होत्या, आयोगाच्या शिफारशीनुसार या जागांसाठी ६३ उमेदवारांची यादी जाहीर झाली यापैकी पल्लवी हिची प्रवर्गातून एकमेव निवड झाली आहे.
यूपीएससीचा हा खडतर प्रवास पल्लवीने मोठ्या कष्टाने केला झोपडपट्टी भाग म्हणून आता आमच्या परिसराची हे टाळणे कोणी करू शकणार नाही, असे डोळ्यात आनंदाश्रू आणत वडील देविदास व आई सुनीता यांनी 'लोकमत'ला सांगितले. देविदास चिंचखेडे हे रंगकाम करतात तर सुनिता या शिलाई मशीन चालवून तिन्ही मुलांचे पालन पोषण करतात. बड्या अधिकाऱ्यांच्या घरी रंगकाम करीत असताना आपली ही मुले अशी मोठ्या पदावर जावी ही मनीषा देविदास चिंचखेडे बाळगून होते.
दरम्यान, आनंद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारी पल्लवी ही हुशार होतीच, तिला आई-वडिलांनी बळ आणि आपल्या परीने मार्गदर्शन केले. त्यांच्यापासून घेतलेल्या पल्लवीने अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी टेक पूर्ण केल्यानंतर तीन वर्षातच खासगी नोकरी सोडली आणि यादरम्यान मिळविलेल्या पैशातून दिल्ली गाठून यूपीएससीची तयारी सुरू केली. चौथ्या प्रयत्नात तिने हा गड सर केला. बार्टीतर्फे अनेक कोचिंगसाठी अनेक संधी एससी एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. एखादी गोष्ट साध्य करायचा निर्धार केला की अडचणी आपोआप दूर सारल्या जातात. असे पल्लवीने म्हटले.