अमरावती : नेहमी गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या समयसूचकतेने अपघात उघडकीस आला, परंतु या भीषण अपघातात सहाजणांचा जीव गेला, नशीब बलवत्तर म्हणून अपघाताची चाहूल लागली की काय म्हणून एकजण आधीच खरपी येथे उतरला आणि काही क्षणात वाहन पुढे गेले आणि हा सहा परिवारांवर आक्रोश आणणारा अपघात घडला... रवि मसराम (२८), असे बचावलेल्या तरुणाचे नाव आहे.
रविवारची मध्यरात्र सहा कुटुंबीयांवर काळरात्र ठरली, खरपी, बहिरम कारंजा, बोदड या मेळघाटच्या पायथ्याशी वजा मध्यप्रदेश सीमारेषेवरील, परतवाडा बैतूल मार्गावर भीषण असा अपघात निंभोरा फाटा येथे घडला. मृतांमध्ये पांडुरंग रघुनाथ शनवारे (वय ३०, रा. बोदड, ता. चांदूर बाजार), सतीश सुखदेव शनवारे (३०, रा. बहिरम कारंजा), सुरेश विठ्ठल निर्मळे (२५, रा. खरपी), चारचाकीचा चालक रमेश धुर्वे (३०, रा. सालेपूर, ता. अचलपूर) या चौघांसह दुचाकीवरील प्रतीक दिनेशराव मांडवकर (२६), अक्षय सुभाष देशकर (२६, रा. बोदड, ता. चांदूर बाजार) यांचा समावेश आहे. अपघातानंतर महामार्ग परिवहन विभाग पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
परतवाडा-बैतूल मार्गावर कारची दुचाकीला जबर धडक; सहा ठार, एक गंभीर
तिघे विवाहित, अक्षय परिवारात एकटाच
मृतांमध्ये प्रतीक मांडवकर त्याला एक लहान भाऊ असून अक्षय देशकर एकटाच होता. मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे, पांडुरंग शनिवारी याला दोन मुले आहेत. हे तिघेही मृतक बोदळ येथील असून सतीश शनवारे कारंजा बहिरम येथील असून त्याला एक मुलगा तर पत्नी गर्भवती आहे. चारचाकीचा चालक रमेश धुर्वे याला पत्नी व दोन मुले आहेत. संपूर्ण सहा मृतदेहांवर अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर तेजस कनाके व डॉ. दीपाली जाधव यांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
एक उतरला आणि दुसरा बसला
परतवाड्यावरुन चारचाकीत पाच जण बसले, त्यापैकी एक सालेपूरचा असल्याने खरपी येथे उतरला. परंतु खरपी चौकात आलेला सुरेश निर्मळे याला लवकर बोदडवरून यांना सोडून येऊ असे म्हणत बसविले आणि जातानाच हा घात झाला. यात त्याचा नाहक बळी गेला. एक उत्तरला आणि दुसरा बसला, त्यात त्याचा जीव गेला असा प्रकार पुढे आला आहे.