अमरावती - अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत निवासी शिक्षण घेणाºया आदिवासी विद्यार्थ्यांची पांढरकवडा पॅटर्ननुसार शासनस्तरावर स्वतंत्रपणे परीक्षा घेण्यात येणार आहे. ‘नामांकित’ विद्यार्थ्यांची या माध्यमातून शैक्षणिक प्रगती तपासली जाणार आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू होईल.
राज्यात ठाणे, नाशिक, नागपूर व अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत २९ प्रकल्पांतील शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना २०१० - २०११ पासून लागू करण्यात आली. परंतु, अपर आयुक्त स्तरावर चिरीमिरी घेऊन बोगस शाळांची नामांकित शाळा म्हणून निवड केल्याचे निदर्शनास आले. परिणामी आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत शिक्षण योजनेला ग्रहण लागले. या योजनेतून बहुतांश शाळा संचालकांचे चांगभलं झाले.दरवर्षी हजारो कोटी रूपये खर्च करूनही आदिवासी विद्यार्थी आजच्या स्पर्धेच्या युगात माघारल्याची बाब शासनाच्या लक्षात आली. मात्र, पांढरकवडा एकात्मिक प्रकल्प अधिकाºयांनी त्यांच्या स्तरावर नामांकित शाळांमध्ये प्रवेशित इयत्ता ५ ते ८ वीतील आदिवासी विद्यार्थ्यांची स्वतंत्रपणे परीक्षा घेतली. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक बुद्धांक वाढीस लागला अथवा नाही, इंग्रजी भाषेचे ज्ञान अवगत झाले काय? अशा विविध प्रश्नांची उकल केली. आता आदिवासी विकास विभागाने हाच पॅटर्न येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरात नामांकित शाळांमध्ये प्रवेशित आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र परीक्षा घेण्यासाठी लागू केला जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर मिळेल संस्थांना शुल्कनामांकित शाळेत इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळेत शिक्षण घेणा-या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर संस्था चालकांना शुल्क दिले जाणार आहे. यात ८० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्यास प्रति विद्यार्थी दरवर्षी ७० हजार रूपये, ७० ते ७९ गुण मिळाल्यास ६० हजार रूपये, ६० ते ६९ गुण मिळाल्यास ५० हजार रुपये तर ६० पेक्षा कमी गुण मिळाल्यास सदर शाळांचे प्रस्ताव अप्राप्त ठरविले जातील, अशी नवी नियमावली आहे.
अमरावती अपर आयुक्त स्तरावर ‘नामांकित’चे प्रवेशित विद्यार्थीअमरावती अपर आयुक्त कार्यालय स्तरावर सात एकात्मिक प्रकल्पातंर्गत ४८ नामांकित शाळांमध्ये १३,१७२ विद्यार्थी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत प्रवेशित आहे. यात धारणी १९६७, अकोला १५२७, पुसद १३०४, पांढरकवडा १४४८, कळमनुरी २६८७, किनवट ३३०५, औरंगाबाद ९२४ असा समावेश आहे.
‘नामांकित’ शाळांमध्ये प्रवेशित आदिवासी विद्यार्थ्यांची स्वतंत्र परीक्षा घेण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित आहे. त्याला मान्यता मिळताच तो अपर आयुक्त कार्यालयस्तरावर राबविला जाईल.- नितीन तायडे,उपायुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती