सुखरूप प्रवास; जंगी स्वागताने भाविक गहिवरले
सूरज दाहाट
तिवसा : कौंडण्यपूर येथून दरवर्षी आई रुक्मिणीची पालखी पंढरपूरला जाते. यावर्षीही ४० वारकऱ्यांसह पालखी पंढरपुरात पोहोचण्यासाठी दोन शिवशाही बसेसची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली होती. कोरोना महामारीच्या संकटकाळात पुरेशी दक्षता बाळगून वारी झाली. माता रुख्मिणीची पालखी शुक्रवारी दुपारी १२ वाजता कौडण्यापुरात पोहोचताच जंगी स्वागत करण्यात आले.
विदर्भाची पंढरी म्हणून अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरला ओळखले जाते. प्रतिपंढरपूर म्हणून रुख्मिणीचे माहेर कौंडण्यपूर म्हंटले जाते. आषाढी एकादशीला दरवर्षी रुख्मिणीच्या पादुका पालखीत घेऊन वारकरी सासरी म्हणजेच पंढरपूरला जातात. १५९४ वर्षांपासून ही चालत आलेली सर्वात जुनी परंपरा आहे. मात्र, यावर्षी कोरोनाच्या सावटात पंढरपूरची आषाढी एकादशी यात्रा रद्द झाली असली तरी पंढरीच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी राज्यातील दहा मानाच्या पालख्यांना राज्य शासनाने परवानगी दिली होती. त्यात ११ पालख्यांतील विदर्भातील एकमेव पालखी म्हणजे कौंडण्यपूरच्या रुक्मिणीच्या माहेरची होय. या पालखीचा जाणे-येण्याचा १८०० किलोमीटरचा प्रवास झाला. कौंडण्यपुरात या पालखीचे फुलांच्या वर्षावात, फटाक्याच्या आतषबाजीत जंगी स्वागत करण्यात आले.
बॉक्स
पालखी येताच येथे वारकऱ्यांचे फुलांत्या वर्षावात करून स्वागत करण्यात आले. वर्धा नदीच्या तिरावर हारफुले शिरवण्यात आलेत. त्यामुळे पुन्हा कौंडण्यपुरात दिवाळीसारखे वातावरण निर्माण झाले होते.
बॉक्स
विदर्भाच्या नंदनवनासाठी विठ्ठलाला साकडे
शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना व गोरगरीब जनतेला सुखी ठेव, कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे, चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेती पिकू दे, महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे" असे साकडे रुख्मिणी व विठ्ठलाला यावेळी भाविकांनी घातले.
कोट
अतिशय भक्तीमय वातावरणात हा सोहळा पार पडला. कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. सर्वजण सुखरूप कौंडण्यपुरात आलेत. शासनाच्यावतीने मी स्वतः पंढरपुरात गेलो होतो.
- वैभव फरतारे, तहसीलदार, तिवसा