पंकज लायदे-श्यामकांत पाण्डेय
धारणी : तालुक्यात आरोग्य सेवा देण्याकरिता मंजूर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आदिवासी बांधव स्वतःच्या घरी वा भूमका, परिहार यांच्याकडे जाऊन आजारावर उपचार घेतात. काही ठिकाणी आरोग्य सेवा उपलब्ध असतानासुद्धा आदिवासी बांधव त्यास नकार देतात. अशा काही प्रसंगांमध्ये बळाचा वापर करावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
प्राप्त माहितीनुसार, धारणी तालुक्यातील १५१ गावांतील आरोग्य सुविधेकरिता बैरागड, बिजुधावडी, कळमखार, हरिसाल, धूळघाट रेल्वे, साद्राबाडी या सहा ठिकाणी प्रत्येकी सहा बेडचे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. धारणी शहरात ५० बेडचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहे. तेथे मंजूर पदांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. सद्यस्थितीत भरारी पथकाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णावर उपचार देणे सुरू आहे.
अतिदुर्गम क्षेत्रातील रंगुबेली, कुंड, खामदा, किन्हीखेडा या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका यांच्याकडून आरोग्य सेवा देणे सुरू आहे. तेथील रुग्णाची प्रकृती जास्त झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकीय अधिकाऱ्यांना कसरत करतच तेथे जावे लागते. ही परिस्थिती दहा वर्षांत ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर अद्याप विश्वास न बसलेल्या आदिवासींना उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्याकरिता प्रकल्प अधिकरी, पोलीस अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी अशा ‘बडा साब’ची मदत घ्यावी लागते.
तालुक्यात वैदयकीय अधिकारी गट अ ची दोन पदे, वैदयकीय अधिकारी गट ब ची चार पदे, मानसेवी वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी व औषधनिर्माण अधिकाऱ्यांची प्रत्येकी दोन पदे, जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सहायक (स्त्री) ची सहा व पुरुषांची चार पदे,
राज्य सेवेतील आरोग्य सहायक (पुरुष) सात पदे, आरोग्य सेविकांची १० पदे, आरोग्य सेवकांची जिल्हा परिषद अंतर्गत दोन व राज्य सेवांतर्गत नऊ पदे, कनिष्ठ सहायकाची १० पदे, परिचराची नऊ पदे, कंत्राटी आरोग्य सेविकांची १० पदे अशी एकूण ७८ पदे रिक्त आहेत. यातील जास्तीत जास्त रिक्त पदे अतिदुर्गम भागातील आहेत. तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी हरिसाल येथे मोनिका कोकाटे, धमानंद सरदार, बैरागड येथे प्रमोद डवंगे, धूळघाट रेल्वे येथे बालाजी डुकरे, साद्राबाडी येथे सागर वडस्कर, सुशील पटेल, बिजुधावडी येथे नीलेश भालतिलक, जगदीश साबळे, कळमखार येथे अभिषेक इंगळे, राखी बरवट, किशोर राजपूत या भरारी पथकाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोग्य सेवा, कोरोना लसीकरण अशी जबाबदारी तोकड्या वेतनात आहे.
तालुका आरोग्य अधिकारी दोन महिन्यांपासून रजेवर
तालुका आरोग्य अधिकारी शशिकांत पवार वडिलांची प्रकृती ठीक नसल्यामुळे दोन महिन्यांपासून रजेवर आहेत. त्यांच्याकडे बैरागड प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभारदेखील होता.
बाईट
जिल्हा परिषद प्रशासनाकडून गतवर्षी सर्वच १२ उपकेंद्रांमध्ये समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची पदे भरली आहेत. काही अडचणी असल्यास आम्ही सर्वच तेथे जाऊन आरोग्य सेवा देत आहे
- जयश्री नवलाखे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी, धारणी