श्यामकांत सहस्त्रभोजने (असाइनमेंट)
बडनेरा : ज्येष्ठा गौरी, गणेशोत्सव पार पडलेत. सध्या पितृ पंधरवड्याला सुरुवात झाली. पितृ पंधरवड्याला घराघरात महत्त्व आहे. यादरम्यान दान, पुण्य, भोजन यावर अधिक भर दिला जातो. कोहळे, पालक, मेथीला मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. कोरोनाकाळात भाजीपाल्यांच्या हातगाड्या बऱ्याच वाढल्याने घरापर्यंत त्या पोहोचतात. किलोमागे पाच ते दहा रुपयांचा फरक पडत असल्याने लोक छोट्या बाजारात भाजीपाला खरेदीला प्राधान्य देतात.
-------------------
भाजी विक्रेते म्हणतात...
पितृपक्ष पंधरवड्यामुळे बाजारात खरेदीदारांची रेलचेल वाढली आहे. सध्या पालक मेथी, कोहळ्याला मागणी बरीच आहे. काही भाज्यांचे दर वाढले, तर काहींचे कमी आहे.
- मंगेश दुधे, विक्रेता
---------
लोकांचा कल पाहून आम्हाला भाजी विकावी लागते. सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. भाजीपाल्याचे दर काहीसे वाढले आहेत. लोक मात्र दरवाढीची चिंता करीत नाही. सणवाराला महत्त्व दिले जाते.
- बबलू अंबडकार, विक्रेता
--------------
अर्धा-एक किलोसाठी बाजारात जाणार कोण?
आठवडी बाजारात ४० रुपये किलोने मिळणारी भाजी दारावर ५० रुपये किलोने मिळते. १० रुपये वाढीव दराने भाजी विकत घ्यावी लागत आहे. मात्र, बाजारात जाण्याचा त्रास वाचतो. दरात फारसा फरक पडत नाही. - जयश्री गुरमाळे, गृहिणी.
----------
हातगाड्यांमुळे घरासमोरच भाजी मिळत असल्याने महिलांसाठी सोयीचे झाले. आठवडी बाजारात पाच ते दहा रुपये दराने भाजीपाला मिळतो. मात्र, घरासमोर किंवा लगतच चौकात मिळणारा भाजीपाला खरेदीला प्राधान्य दिले जाते.
- बबिता वाडेकर, गृहिणी
----------
मागणी वाढली
पितृपक्ष पंधरवड्यामुळे अमरावती शहरातील विविध ठिकाणच्या बाजारात, चावडी तसेच हातगाड्यांवर भाजीपाल्यांचे दर वाढले आहे. सध्या बटाटे, टोमॅटोची मागणी कमी झाली आहे. पालक तसेच कोहळ्याची मागणी अशावेळी अधिक असते. काही भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ, तर काही भाज्यांच्या दरात घट झालेली आहे.
-----------
भाजीपाल्यांचे दर (प्रति किलो)
भाजी। बाजारातील दर। घराजवळ
पालक। ४० ५०
कोहळे। २५ ३०
वांगी। ४० ५०
टोमॅटो। १५ २०
बटाटा। ३० ४०
भेंडी। ३० ४०
फुलकोबी। ३० ४०