अमरावती : आदिवासी विकास विभागाशी संलग्न शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, नामांकित इंग्रजी माध्यम शाळा व सैनिकी शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करावे, असे आदेश ‘ट्रायबल’ आयुक्तांचे होते. मात्र, ४ डिसेंबर उजाडला असताना, एकही आश्रमशाळा सुरू झाली नाही. पालकांच्या संमतिपत्राच्या मुद्द्यावर शिक्षकांना काहीही करता आलेले नाही, हे वास्तव आहे.
आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी नागपूर, अमरावती, ठाणे व नाशिक अंतर्गत
नववी ते बारावीपर्यंत प्रवेशित आश्रमशाळा, वसतिगृहे १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे पत्र अपर आयुक्तांना दिले होते. एवढेच नव्हे तर व्हिडीओ कॉन्फरसिंगद्धारे पालकांचे संमतिपत्र घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. मात्र, कोरोना संसर्गाची भीती पालकांच्या मनात कायम असल्याने एकाही पालकाने संमतिपत्र लिहून दिले नाही. किंबहुना आश्रमशाळा, वसतिगृह, नामांकित इंग्रजी माध्यम शाळा व सैनिकी निवासी शाळांमध्ये विद्यार्थी पोहोचले नाहीत. कोराेनामुळे शिक्षणात खंड पडू नये, यासाठी गणित, विज्ञान व इंग्रजी अभ्यासक्रमाचे धडे देण्याबाबत शिक्षकांनी नियोजन चालविले. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची कोविड चाचणीदेखील करण्यात आली. मात्र, पालकांची मुलांना शाळेत पाठविण्यासाठी नकारघंटा असल्याने शिक्षक, मुख्याध्यापक हैराण झाले आहे.
-------------------
नववी ते बारावीचे ३३ हजार ४९१ विद्यार्थी
अमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत धारणी, अकोला, किनवट, पांढरकवडा, औरंगाबाद, कळमनुरी व पुसद या सातही प्रकल्पस्तरावर नववी ते बारावीपर्यंत ३३ हजार ४९१ विद्यार्थी आहेत. यात शासकीय
आश्रमशाळांमध्ये ११, ६२२, अनुदानित आश्रमशाळांमध्ये१६,१३९, नामांकित सीबीएसई शाळांमध्ये २२१६, नामांकित स्टेट बोर्ड शाळांमध्ये १५२६, तर सैनिकी शाळांमध्ये १९४८ विद्यार्थी आहेत.
--------------------
आश्रमशाळांमध्ये मुलांना पाठविण्यासाठी पालकांपर्यंत शिक्षक पोहोचले. मुलांची जबाबदारी घेत असाल, तरच शाळेत पाठवितो, काहीही लिहून देणार नाही, अशी बहुतांश पालकांची भूमिका आहे. पालकांमध्ये कोरोनाची धास्ती असल्यामुळेच विद्यार्थी शाळेत आलेले नाहीत.
- विनोद पाटील, अपर आयुक्त, अमरावती.
-------------
मुलांची जबाबदारी कोणीही घेण्यास तयार नाही. कोरोनाचे संकट कायम आहे. आश्रमशाळांमध्ये कोणी विद्यार्थी संक्रमित आढळल्यास उपायोजना नाही. कोविड लस आल्यानंतरच मुलांना शाळेत पाठवू, शिक्षणापेक्षा जीव महत्त्वाचा आहे.
- रमेश सयाम, पालक.