लाल दिव्याची प्रतीक्षा : कणखर नेतृत्वाची गरजअचलपूर : भाजपची दिल्लीपासूनची गटबाजी आता गल्लीबोळापर्यंत पोहोचली आहे. अचलपूर तालुक्यातही फारशी वेगळी स्थिती नाही. दमदार नेतृत्त्व मिळाल्यास भाजपाची ही गटबाजी दूर होऊ शकते. त्यासाठी एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद किंवा लाल दिवा या तालुक्याला मिळायला हवा. अचलपूर-परतवाडा ही जुळी नगरी अमरावती जिल्ह्याच्या राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र आहे. अचलपूर-परतवाडा शहरासह तालुक्यात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, आरपीआय, बहुजन समाज पक्ष, प्रहार या पक्षांचेदेखील प्राबल्य आहे. यापैकी बहुतांश पक्षांमध्ये गटबाजीला ऊत आला आहे. पदांसाठी कार्यकर्त्यांची चढाओढ सुरू असते. कोण कोणाला कसे बाद करतो यासाठी सतत डावपेज आखले जातात. या गटबाजीमुळेच कोणतेही नवीन नेतृत्त्व तालुक्यात उदयास येत नाही. भाजप-सेना युतीच्या शासनाला एक वर्ष पूर्ण झाले. विधानसभा निवडणुकांना वर्ष लोटले. परंतु वर्षभरानंतरही निवडणुकीच्यावेळी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई केली गेली नसल्याने प्रामाणिक कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. पक्षाजवळ कार्यकर्त्यांची फळी आहे. जिल्हास्तरीय पदाधिकारीही आहेत. राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या अचलपूर तालुक्याला विनायकराव कोरडे यांच्यानंतर विधानसभेत सत्ता मिळाली नाही किंवा लाल दिव्याची गाडीही मिळाली नाही. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेत किंवा सहकार राजकारणात भाजपला अजूनही पाय रोवता आले नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध कार्यकारी सोसायटी, अमरावती जिल्हा को-आॅप. बँक आदी सहकारी संस्थांच्या सत्तेचा स्पर्शही भाजपला झालेला नाही. तरीही येथे भाजपा विजयश्री मिळाली. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांना एखाद्या महामंडळाचे अध्यक्षपद किंवा कार्यकर्त्यांना विविध समित्यांवर महत्त्वाचे पद मिळावे, अशी अपेक्षा आहे. (शहर प्रतिनिधी)
अचलपुरात भाजपला गटबाजीचे ग्रहण
By admin | Published: January 16, 2016 12:23 AM