- गणेश वासनिक
अमरावती - भुसावळ ते नागपूर दरम्यान रेल्वे पुलांची दुरुस्ती, डागडुजीच्या नावाखाली बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्या कायम हद्दपार करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. १ जानेवारी २०१९ पासून बंद असलेल्या पॅसेंजर गाड्यांमुळे गरीब, सामान्य प्रवाशांचे हाल होत असून, आर्थिक फटकादेखील बसत आहे. सहा रेल्वे पॅसेंजर बंद असल्याची माहिती आहे.पॅसेंजर गाड्यांचे प्रवास भाडे कमी असल्यामुळे गरीब, सामान्य प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. विशेषत: अकोला, नागपूर, शेगावकडे ये-जा करण्यासाठी पॅसेंजर गाडीला अधिक पसंती दिली जाते. मात्र, भुसावळ रेल्वे स्थानकावर विविध विकासकामे आणि पावसाळ्यापूर्वी पुलांची दुरुस्ती करण्याच्या नावाखाली पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्यात. परंतु, सहा महिन्यांचा कालावधी झाल्यानंतरही पॅसेंजर गाड्या सुरु होत नसल्याने बहुतांश प्रवाशांना एसटी अथवा महागड्या रेल्वेच्या एक्स्प्रेसने प्रवास करावा लागत आहे. पॅसेंजर गाड्यातून रेल्वेला आर्थिक उत्पन्न मिळत असताना बंद करण्याचे कारण हे गुलदस्त्यात आहे. लहान, मोठ्या रेल्वे स्थानकावर पॅसेंजर गाड्यांचे थांबे असल्यामुळे गरीब, सामान्य प्रवाशांसाठी ते सोईचे ठरत होते. मात्र, जानेवारीपासून बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या जुलै महिना संपण्याकडे वाटचाल सुरू झाली असताना, त्या सुरू होत नसल्याचे चित्र आहे. या सहा पॅसेंजरच्या फे-या बंद भुसावळ ते नागपूर दरम्यान सहा पॅसेंजर गाड्यांच्या फेºया बंद करण्यात आल्या आहेत. यात भुसावळ-वर्धा, अमरावती-नागपूर, वर्धा-भुसावळ, भुसावळ-वर्धा, नागपूर-अमरावती, वर्धा-भुसावळ अशा सहा फेºया बंद झाल्या आहेत. नरखेड-भुसावळ आणि अमरावती-नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू आहे. अमरावती-बडनेरा लोकलसुद्धा बंद असल्याने विद्यार्थ्यांसह गरीब, कामगारांना ये-जा करणे कठीण झाले आहे.
प्रवासी संख्येत घट; उत्पन्न कायमजानेवारीपासून पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे दरमहा १० ते १२ हजार प्रवासी घटले आहेत. मात्र, रेल्वेच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती एका वाणिज्य विभागातील अधिका-यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. पॅसेंजर गाड्या बंद असल्या तरी एक्स्प्रेस व अन्य रेल्वे गाड्यांनी नागरिक प्रवास करतात. यंदा जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्या १४ हजारांनी रोडावल्याचा अहवाल बडनेरा रेल्वे स्थानकाच्या वाणिज्य विभागाने वरिष्ठांकडे पाठविला आहे.
नागपूर-भुसावळ दरम्यान बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना निवेदन देण्यात आले आहे. ही मागणी दैनंदिन प्रवासी वर्गांनी आधीच केलेली आहे. बंद पॅसेंजर का सुरू झाल्या नाहीत, यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करू.- नवनीत रवि राणा, खासदार, अमरावती काही ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर कामे अद्यापही सुरूच आहेत. दरदिवसाला दोन ते तीन तासांचे ब्लॉक होत आहेत. अद्यापपर्यंत बंद पॅसेंजर गाड्यासंदर्भात निर्णय झाला नाही. - पी.के. सिन्हा प्रबंधक, रेल्वे स्थानक बडनेरा. पॅसेंजर गाड्यांमुळे लहान, मोठ्या रेल्वे स्थानकावर कमी पैशात ये-जा करणे सुकर होते. सहा महिन्यांपासून पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे बस किंवा महागडा प्रवास करावा लागत आहे. पॅसेंजर गाड्या सुरुव्हाव्यात. - रोशन चव्हाण, रेल्वे प्रवासी, बडनेरा.