वर्ष लोटले : अंजनसिंगी ते धामणगाव रस्त्याचे कधी होणार डांबरीकरण?
अंजनसिंगी : धामणगाव रेल्वे व तिवसा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला एक वर्षांपासून सुरुवात झाली. रस्त्याचे हे काम सध्या अंजनसिंगीजवळील ढाकूलगावपर्यंत येऊन पोहोचले. या रस्त्याच्या कामाला आता एक वर्ष पूर्ण होत असताना, अजूनपर्यंत एक किलोमीटर रस्तादेखील कंपनीने पूर्ण केलेला नाही. परिणामी या कच्च्या रस्त्यावरून लोकांना ये-जा करावी लागते. बांधकामाच्या प्रतीक्षेत असलेल्या या रस्त्यावरून उडणाऱ्या धूलिकणांमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. नागरिकांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.
जुना धामणगावपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. संबंधित कंपनीने काम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजू खोदून ठेवल्या. काही ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे, तर काही ठिकाणी सिमेंट रस्त्याचे व नालीचे काम अर्धवट रेंगाळले आहे. रात्रीच्या वेळी दिवे वा रिफ्लेक्टर कुठेही नाहीत. रेडियमचा तर पत्ताच नाही. हा रस्ता यवतमाळ जिल्ह्याला जाणार असून तिवसा, मोर्शीपासूनचे प्रवासी या रस्त्याचा वापर करतात. खराब रस्त्यामुळे वाहनांचा मेंटेनन्स वाचला. अनेकांना श्वासाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
धुळीवर पाण्याचा वापर अनियमित
काही दिवस दररोज या रस्त्यावर दोन वेळा पाणी मारले जात होते. यामुळे धूळ कमी झाली होती. पण, मागील आठवड्यापासून या कामात अनियमितता आली आहे. आठवड्यातून एक किंवा दोन दिवस एक वेळा पाणी मारलेले दिसते. या कारणाने धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणात वाढ झाली आहे.