फोटो - गाय १३ पी
तिवसा : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. सोमवारी सकाळी तिवसा पंचवटी चौकात उभा असलेल्या नादुरुस्त कंटेनरमधून पोलिसांनी ५३ जनावरे बाहेर काढली. यापैकी सात जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला होता. चालक ट्रक सोडून पसार झाला.
पोलीस सूत्रांनुसार, नागपूरहून अमरावती मार्गे पी.बी. ०८ बी.एन. ५२७७ या क्रमांकाचा कंटेनर ट्रक तिवसावरून जात होता. रात्री हा कंटेनर पंचवटी चौकात नादुरुस्त होऊन बंद पडला. यानंतर चालकाने वाहन सोडून पलायन केले. हा कंटेनर रात्रीपासून उभा असल्याची पोलिसांनी खात्री केकेल्यानंतर तो उघडून पाहिला असता, यात जनावरे आढळून आली. यामुळे पंचवटी चौकात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी उसळली. तिवसा पोलिसांनी घटनास्थळाहून दुसऱ्या ट्रकच्या साहाय्याने मोझरी येथील गुरुकुंज आश्रमातील गौरक्षणात कंटेनर नेला. गौरक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जेसीबीने पाय बांधलेल्या ५३ जनावरांची सुटका करण्यात आली. यापैकी ४६ जिवंत होती. सात जनावरे गुदमरून मेल्याचे जखमी पशूंवर उफचार करणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितले. तिवसा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.