अमरावती : पशुवैद्यक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे जिल्ह्यातील पशुधनावर वाईट दिवस आले असून, चांदूरबाजार तालुक्यात काही मेंढ्या दगावल्या. त्यापैकी एक मेंढी घेऊन पशुपालक रवि पाटील जिल्हा परिषदेच्या कार्यालयात पोहोचले. यामुळे जिल्हा परिषदेत काही काळ तणाव निर्माण झाला. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे तणाव निवळला.
रवि पाटील चांदूर बाजार तालुक्यातील बेसखेडा येथे पशुपालनाचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडील मेंढ्या आजारी पडल्यामुळे त्यांनी १० दिवसापूर्वी तालुका व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला कळविले होते. परंतु, अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. परिणामी सोमवारी एक मेंढी दगावली. तिला घेऊन रवि पाटील थेट जिल्हा परिषद कार्यालयात पोहोचले. तालुका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे मेंढ्या दगावल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधितावर कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली. अखेर यावर अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून हा तिढा सोडविला.
बॉक्स
अहवाल मागितला
रवि पाटील यांच्या तक्रारीनंतर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व पशुसंवर्धन उपसंचालकांनी चांदूर बाजार येथील पशुधन अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. तीन दिवसात खुलासा मागविला आहे. पाटील यांच्या तक्रारीची सदर अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतली नाही, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.