रस्ते, नाल्या, पथदिव्यांची समस्या कायम : कैलासनगर, भाराणी लेआऊट, अंकिता लेआऊटमधील नागरिक संतप्तअमरावती : मागील १५ वर्षांपासून या परिसरातील मूलभूत समस्या कायम आहेत. रस्ते, नाल्या, पथदिवे, सांडपाण्याची विल्हेवाट, मैदान, बगिचा, रुग्णालय, शहर बस सेवा, पोलीस चौकी, नाल्यावरील पूल, जेष्ठ नागरिकांसाठी सुविधा, यासाठी नागरिकांनी महापालिका प्रशासन, आमदार, स्थानिक नगरसेवकांशी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, या दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाच्या समस्यांकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. अनुसूचित जातीबहुल परिसर असल्याने या भागाकडे दुर्लक्ष केले जाते, असा या परिसरातील नागरिकांचा आरोप आहे. या परिसरातून येण्यासाठी असलेला महादेव खोरी ते छत्री तलाव हा मुख्य मार्गाची मोठी दुर्दशा झालेली, रस्त्याला ठिकठिकाणी भगदाड पडली आहेत. महादेव खोरीकडून येणाऱ्या नाल्यावर पूल नाही. त्यामुळे पावसाळ्यात नाला ओव्हरफ्लो होऊन दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी होते. पूल मंजूर आहे, असे सांगण्यात येते. मात्र अजून कामाला सुरुवात झालेली नाही. नगरसेवक केवळ भूलथापा देतात. अंतर्गत रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. बहुतांश ठिकाणी रस्ते नाहीत, जिथे आहेत तिथे दुरुस्ती नाही. रस्त्याची डागडूजी वषोगिणती केली जात नाही, पावसाळ्यात मुरुम टाकला जात नसल्याने चिखलातून वाहन चालविणे कठीण झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरापर्यंत वाहन जात नाहीत, रस्ते खराब असल्यामुळे स्कूल बसदेखील दूरवर उभ्या राहतात. तेथवर मुलांना पोहोचवून द्यावे लागते. रस्ते खराब असल्याने आॅटो या भागात फिरकत नाही. त्यामुळे या परिसरात आॅटो स्टँड व शहर बससेवा सुरू करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. बहुतेक ठिकाणी नाल्या नाहीत. त्यामुळे सांडपाण्याची डबकी ठिकठिकाणी साचली आहेत. गटार योजनेचे काम अपुरे आहेत. सफाई कामगार नियमित सेवा देत नाहीत. हायड्रोलिक आॅटो कचरा उचलण्यास येत नाही. कचऱ्याचे कंटेनर महापालिकेच्या आवारात ठेवले आहेत. पथदिवे नियमित लागत नाही. बंद पडल्यास महिनोमहिने दुरूस्त केले जात नाही. या परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. या प्रकाराला नागरिक त्रस्त झाले आहेत.या परिसरातील ले-आऊटमध्ये असणाऱ्या खुल्या जागेवर मैदान व बगिच्या विकसित करण्यात आलेला नाही. झाडे लावली नाहीत. मुलांना खेळायला बगिच्या नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठलीही सुविधा नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा असलेल्या या परिसरात महापालिकेची रुग्णालये नाहीत. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास वडाळी रुग्णालयाशिवाय रुग्णांना पर्याय नाही. परिसरात सर्वच काटेरी झुडूपे वाढलेली आहेत. दिवसाही साप-विंचू निघतात. अंडर पाथजवळ पथदिवे नाहीत. सायंकाळी या ठिकाणी सर्रास जुगार चालतो, त्यामुळे या परिसरात पोलीस चौकी होणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांनी सामूहिकरीत्या एखादा कार्यक्रम करावा, यासाठी परिसरात समाज मंदिर निर्मितीची गरज आहे. याच प्रभागातील दुसऱ्या भागात सर्व सुविधांची निर्मिती केली जात असताना या भागाकडे मात्र नगरसेवक हेतूपुरस्सर दुर्लक्ष करतात, असा या परिसरातील नागरिकांचा आरोप आहे. आम्ही करदाते आहोत. आम्हाला सुविधा द्या, अशी नागरिकांची मागणी आहे.
‘इथल्यापेक्षा गावाकडील पांदण रस्ते तरी बरे’
By admin | Published: June 10, 2016 12:13 AM